ढाका: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये काल पहिला वनडे सामना झाला. या मॅचआधी काही घडामोडी घडल्या आहेत. टॉसच्यावेळी रोहित शर्माने ऋषभ पंतला रिलीज केल्याची माहिती दिली. ऋषभ पंतला अचानक का रिलीज केलं? हा प्रश्न विचारला जातोय. पंत वनडे टीमचा भाग होता. पण, अचानक तो वनडे सीरीजमध्ये खेळणार नाहीय, अशी बातमी आली.
बोर्डाने काय सांगितलं?
मेडीकल टीमच्या सल्ल्यावरुन पंतला रिलीज केल्याची माहिती बीसीसीआयकडून प्रेस रिलीजमध्ये देण्यात आली. आता अशी माहिती समोर येतये की, ऋषभने स्वत:च कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांच्याकडे वनडे सीरीजआधी रिलीज करण्याची विनंती केली.
पंतने अशी मागणी का केली?
क्रिकबजच्या रिपोर्ट्नुसार ऋषभ पंत न्यूझीलंडवरुन ढाक्यात पोहोचल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांना भेटला. ढाका येथे त्याने नेट प्रॅक्टिसही केली. त्यानंतर त्याने स्वत: कॅप्टनकडे वनडे सीरीजमधून रिलीज करण्याची मागणी केली. पंतने अचानक अशी मागणी का केली? ते समजू शकलेलं नाही. एक गोष्ट स्पष्ट आहे, ऋषभ पंतवर कुठलीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही तसेच त्याला कोविड-19 ची लागणही झाली नव्हती.
टेस्ट सीरीजमध्ये पंत खेळणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार ऋषभ पंत फक्त तीन वनडे सामन्यांमध्ये खेळणार नाहीय. पंत कसोटी मालिकेत खेळू शकतो. 14 डिसेंबरपासून टेस्ट सीरीज सुरु होणार आहे. टीम मॅनेजमेंटने पंतच्या रिप्लेसमेंटची मागणी केलेली नाही. कारण इशान किशन आधीपासूनच स्क्वाडमध्ये आहे.
दुसऱ्या खेळाडूंना पंतबद्दल माहित नव्हतं
ऋषभ पंतला टीममधून रिलीज केलय, हे केएल राहुलला सुद्धा माहित नव्हतं. ड्रेसिंग रुममध्ये पोहोचल्यानंतर पंतला रिलीज केल्याचं राहुलला समजलं. पंतच्या अनुपस्थितीत केएल राहुलने विकेटकिपिंगची जबाबदारी संभाळली.
पंतने का रेस्ट घेतली?
ऋषभ पंत अनफिट असल्याची कोणतीही बातमी समोर आलेली नाही. खराब फॉर्ममुळे त्याच्यावर दबाव आल्याची शक्यता आहे. टीम इंडियाकडून खेळताना पंत टी 20 वर्ल्ड कप, आशिया कप आणि न्यूझीलंड दौऱ्यावर अपयशी ठरला होता. त्याच्यावर बरीच टीका सुरु होती. म्हणून कदाचित त्याने रेस्टचा निर्णय घेतला असावा.