डेहराडून: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतसोबत शुक्रवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. ऋषभ पंतच्या कारला दिल्ली-डेहराडून हायवेवर रुडकी जवळ अपघात झाला. ऋषभची कार डिवायडरला धडकली. पंतची कार या धडकेनंतर पलटली. त्यानंतर कारला आग लागली. पंत कसाबसा कारच्या बाहेर पडला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. ऋषभला या अपघातात गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्या पायाला सुद्धा फ्रॅक्चर आहे. आता प्रश्न हा आहे की, पंतसोबत ही दुर्घटना कशी घडली? पंतची कार कशी पलटी झाली?
पोलीस तपासात काय समोर आलं?
ऋषभ पंत रुडकी येथे आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी चालला होता. त्यावेळी स्टेअरिंगवर असताना ऋषभचा डोळा लागल्यामुळे हा भीषण अपघात झाला. कार रुडकीच्या दिशेने असताना, नारसानपासून 1 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला, असं हरिद्वारचे एसपी एसके सिंह यांनी ही माहिती दिली.
क्रिकेटपटू ऋषभ पंतचा पहाटे भीषण अपघात झाला. या अपघतात ऋषभ गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.#Rishabpant #Rishabpantaccident #accident #IndianCricketer #TeamIndia pic.twitter.com/kwP57lghYD
— BhimRao Gawali (@BhimraoGawali) December 30, 2022
पोलिसांना अपघाताबदद्ल किती वाजता समजलं?
“पहाटे 5.30 च्या सुमारास ऋषभ पंतच्या कारला अपघात झाल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्यालाआधी रुडकीच्या सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर डेहराडूनच्या रुग्णालयात हलवलं. तो स्वत: कार चालवत होता. तो गाडीत एकटाच होता” अशी माहिती पोलीस अधिकारी एसके सिंह यांनी दिली.
पुढील उपचार कुठे होणार?
ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात उपचार करण्यात येतील. गरज पडल्यास, त्याला एक-दोन दिवसात दिल्लीच्या रुग्णालयात त्याला हलवण्यात येईल. दिल्ली आणि डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोशिएशनने ही माहिती दिली.