मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिका (India vs West Indies, 1st T20I ) बुधवारपासून सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मीडियाशी संवाद साधत पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. रोहित शर्माला हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) पुनरागमनावर आणि त्याच्या भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर कर्णधाराने अतिशय मनोरंजक उत्तर दिले. रोहित शर्माने हार्दिक पंड्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना टी-20 विश्वचषकासाठी संघाची निवड कशी करणार हे देखील सांगितले. त्याचवेळी त्याने सांगितले की, संघातील सर्व खेळाडूंना त्यांच्या भूमिकेची पूर्ण माहिती देण्यात आली असून आता त्यांना त्यांची प्रतिभा दाखवावी लागेल.
रोहित शर्माला हार्दिक पंड्याबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘हार्दिक पंड्या हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात योगदान देतो. पंड्या फलंदाज म्हणून खेळू शकतो की नाही यावर संघ व्यवस्थापनात कोणतीही चर्चा झालेली नाही, परंतु प्रत्येक खेळाडूने पूर्णपणे तंदुरुस्त (फिट) असावे, जेणेकरून आम्ही आणखी एक पाऊल टाकू शकू.
रोहित शर्मा म्हणाला, “जेव्हा सर्व खेळाडू फिट असतील, तेव्हाच आम्ही पुढचं पाऊल टाकू. प्रतिस्पर्धी संघांनुसार खेळाडूंची निवड केली जाईल. टीम इंडियाची दारं सर्वांसाठी खुली आहेत.” रोहित शर्मा पुढे म्हणाला, ”आम्ही विश्वचषकासाठी झटपट निर्णय घेऊ शकत नाही. आम्हाला विश्वचषकासाठी योग्य टीम कॉम्बिनेशन शोधावे लागेल. ऑस्ट्रेलियातील प्रत्येक मैदानाची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे टीम कॉम्बिनेशन प्रत्येकाला अनुसरून पाहावे लागणार आहे. आपल्याकडे किती स्पिन आणि पेस ऑलराउंडर खेळाडू आहेत जे खालच्या क्रमांकावर उतरून चांगली फलंदाजी करू शकतात ते पाहावे लागेल. गोलंदाजांचेही तसेच आहे, परिस्थितीनुसार त्यांचा वापर केला जाईल.
रोहित शर्मा पुढे म्हणाला, ‘आम्ही सर्व खेळाडूंना त्यांची भूमिका सांगितली आहे. आता ते त्यांचे कौशल्य कसे दाखवतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे. संघाला कोणत्याही खेळाडूची जागा घेऊ शकतील अशा बॅकअप खेळाडूंचीही गरज आहे. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या जोडीवरही रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे. रोहित शर्मा म्हणाला, ‘युझवेंद्र चहल लयीत आहे आणि कुलदीपला काही काळ दुखापत झाल्याने त्याला फॉर्ममध्ये परत यायला वेळ लागेल. रिस्ट स्पिनरला लयीत यायला वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला वाट पहावी लागेल. तो स्वत:वर, गोलंदाजीवर खूप काम करतोय, नेट्समध्ये ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते.
इतर बातम्या
IND vs WI: टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का, स्टार ऑलराऊंडर T20 मालिकेतून बाहेर
IPL 2022: ‘एलआयसी’चं आयपीएल कनेक्शन: कोणत्या संघात कुणाचा किती वाटा?