मुंबई: टीम इंडियाने काल तिसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून सीरीज जिंकली. पण या मालिका विजयानंतरही रोहित शर्मा निर्धास्त नाहीय. त्याला चिंता लागून राहिली आहे. टी 20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियाला बरीच मेहनत करावी लागणार आहे, असं रोहित शर्माने सांगितलं. पुढच्या दोन दिवसात टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे.
त्याचा टीम इंडियाला फटका बसला
रोहितच्या मते खासकरुन डेथ बॉलिंगवर मेहनत करण्याची गरज आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या ओव्हर्समध्ये संघर्ष करताना दिसले. अखेरच्या हाणामारीच्या ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाजांनी मोठ्या प्रमाणात धावा दिल्या. त्याचा टीम इंडियाला फटका बसला.
एका खेळाडूची बॉलिंग जास्त चिंतेचा विषय
ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होणार आहे. त्यावेळी डेथ ओव्हर्समध्ये इतक्या धावा देणं परवडणारं नाही. खासकरुन सीनियर बॉलर भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी चिंतेचा विषय आहे. आशिया कपपासून त्याने 19 व्या ओव्हरमध्ये मोठ्या प्रमाणात धावा दिल्या. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला.
रोहित काय म्हणाला?
बॉलिंगमध्ये आम्हाला विशेष सुधारणा करण्याची गरज आहे, असं रोहित शर्मा मालिका विजयानंतर म्हणाला. “अनेक विभाग आहेत, खासकरुन बॉलिंगमध्ये सुधारणेची आवश्यकता आहे. बऱ्याच मोठ्या गॅपनंतर बुमराह आणि हर्षल पटेलने कमबॅक केलय. ऑस्ट्रेलियाच्या मिडल आणि लोअर ऑर्डरला बॉलिंग करणं तितक सोपं नाहीय. ते ब्रेक नंतर आले आहेत. थोडावेळ त्यांना लागेल. त्यांना त्यांची लय सापडेल” अशी अपेक्षा रोहितने व्यक्त केली.
हार्दिकचा विजयी चौकार
सीरीजमधील काल तिसरा सामना हैदराबादमध्ये झाला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हार्दिक पंड्याने लास्ट ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर चौकार मारुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाने एक चेंडू आणि सहा विकेट राखून विजय मिळवला.