पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : विश्वकरंडक स्पर्धेचा भारताचा चौथा सामना पुणे शहरात गुरुवारी होत आहे. भारत-बांगलादेश यांच्यात हा सामना रंगणार आहे. पुणे शहरातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर कर्णधार रोहित शर्मा याच्या खेळीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण तो गुरुवारी होणाऱ्या सामन्यात इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा वर्ल्ड कपमधील सर्वाधिक धावांचा विक्रम रोहित शर्मा मोडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी गुरुवारी एका बातमीमुळे रोहित शर्मा चर्चेत आला. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर त्याची गाडी सुसाट चालवल्याची ही बातमी आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर रोहित शर्मा याने ‘264’ क्रमांक असणारी त्याची लेम्बोर्गिनी ही गाडी चालवली. ही गाडी चालवली म्हणण्यापेक्षा सुसाट पळवली. अगदी 200 किमीच्या वेगाने त्याने ही गाडी पळवली. त्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वेगाने गाडी चालवल्याबद्दल रोहित शर्मा याला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. परंतु या वृत्तीला दुजोरा मिळाला नाही. सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.
Rohit Sharma gets 3 challan #RohitSharma pic.twitter.com/oJtaJPzwsK
— Arpit Verma (@AV18mth) October 18, 2023
रोहित शर्मा याने वेगाने गाडी चालवल्यामुळे पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याने सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या या महामार्गावर पोलीस एस्कॉर्ट असलेल्या बससोबत प्रवास करायला हवा होता, असे म्हटले आहे. रोहित शर्मा याच्या नावावर तीन ऑनलाईन चलन बनवण्यात आल्याचे वृत्त दिले गेले आहे. परंतु पोलिसांकडून या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही.
रोहित शर्मा याने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वेगाने गाडी चालवल्याच्या बातमीची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. एका युजरने म्हटले आहे की, रोहित शर्मा याला वेगाची आवड आहे. त्यामुळे त्याने द्रुतगती मार्गावर २०० च्या वेगाने गाडी चालवली. परंतु काहीच हरकत नाही, त्याने सामन्यात २०० धावा काढल्या म्हणजे मजा येईल. सोशल मीडियावर अनेकांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यात काहींनी वेगाने गाडी चालवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.