मुंबई: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ यंदाच्या सीजनमध्ये खूपच सुमार कामगिरी करतोय. सलग आठ सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे. आयपीएलचा (IPL) यंदाचा 15 वा सीजन आहे. आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्सची ही सर्वात खराब कामगिरी आहे. मुंबईच्या संघाला एक विजय मिळवणं मुश्किल बनलयं. मुंबई इंडियन्सकडून अशाच कामगिरीची कोणीच अपेक्षा केली नव्हती. कारण मुंबई इंडियन्स आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आयपीएलची पाच विजेतेपद मिळवली आहेत. अशी कामगिरी दुसऱ्या कुठल्याही संघाला करता आलेली नाही. मुंबई पाठोपाठ चेन्नईने आयपीएलची चार विजेतेपद मिळवली आहेत. मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या प्रदर्शनाने टीम इंडियाचीही चिंता वाढवली आहे. कारण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) सुद्धा फॉर्ममध्ये नाहीय. त्याच्या बॅटमधून धावा जणू आटल्या आहेत. आयपीएल संपल्यानंतर एक मोठा आंतरराष्ट्रीय सीजन समोर आहे. त्यामुळे रोहितचा फॉर्म टीम इंडियाच्या चाहत्यांची चिंता वाढवणारा आहे.
मुंबईच्या इंडियन्सच्या या कामगिरीवर कॅप्टन रोहित शर्माने अखेर टि्वट केलं आहे. “या स्पर्धेत आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करु शकलेलो नाही. पण असं कधी कधी घडतं. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांना अशा स्थितीतून जावं लागतं. पण माझं मुंबई इंडियन्सवर आणि इथल्या वातावरणावर प्रेम आहे. आमच्या हिंतचितकांचे मी आभार मानतो. या परिस्थितीतही ते संघासोबत आहेत” असं रोहितने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
We haven’t put our best foot forward in this tournament but that happens,many sporting giants have gone through this phase but I love this team and it’s environment. Also want to appreciate our well wishers who’ve shown faith and undying loyalty to this team so far ?@mipaltan
— Rohit Sharma (@ImRo45) April 25, 2022
इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा सीजन मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा आहे. पाचवेळचा चॅम्पियन संघ आतापर्यंत आठ सामने हरला आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्सची टीम तळाला आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मुंबई इंडियन्सने आठ सामने गमावले आहेत. मुंबईच्या या दयनीय प्रदर्शनात फलंदाजी आणि गोलंदाजीचा मोठा रोल आहे. या दोन्ही आघाड्यांवर मुंबईचा संघ अपयशी ठरला आहे. मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणं, जवळपास अशक्यच आहे. पराभवानंतर कुठल्याही संघात गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. आता मुंबई इंडियन्सच्या संघातही हेच होताना दिसतय.