मुंबई: दुखापतीमुळे कॅप्टन रोहित शर्मा बांग्लादेश विरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. बांग्लादेश विरुद्ध 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे रोहित सीरीजमधला तिसरा वनडे सामना खेळू शकला नाही. तो भारतात परतला. याच दुखापतीमुळे रोहित पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्याजागी केएल राहुल टीमच नेतृत्व करतोय.
दुसरा कसोटी सामना कधी?
वनडे सीरीज गमावणाऱ्या टीम इंडियाचा प्रयत्न कसोटी मालिका जिंकण्याचा आहे. पहिल्या कसोटीत भारताच वर्चस्व दिसून आलय. चटोग्राम कसोटी जिंकून मीरपूरमध्ये सीरीज विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. 22 ते 26 डिसेंबर दम्यान दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.
रोहितने काय सांगितलय?
दरम्यान रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल महत्त्वाची अपडेट आहे. स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार, रोहित दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध राहू शकतो. तो शुक्रवारी किंवा शनिवारी बांग्लादेशला रवाना होईल. मी फिट असून मीरपूर कसोटीसाठी उपलब्ध असल्याचं रोहितने सांगितलय.
रोहितच्या जागी कोहली ओपनिंगला
दुसऱ्या वनडेत रोहितला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्याजागी विराट कोहली शिखर धवनसोबत ओपनिंगला उतरला होता. पण ही जोडी यशस्वी ठरली नाही 272 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने खूपच खराब सुरुवात केली.
दुखापत होऊनही जबरदस्त फलंदाजी
दुसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने अर्धशतक झळकवून डाव सावरला. पण दोघे बाद होताच भारताचा डाव अडचणीत सापडला. त्यावेळी रोहित शर्मा 9 व्या नंबरवर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने 28 चेंडूत नाबाद 51 धावा फटकावल्या. त्याच्या बॅटिंगमुळे विजयाची आशा निर्माण झाली होती. पण तो टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. टीम इंडियाने 5 रन्सनी हा सामना गमावला.