सिडनी: रोहित शर्माचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी टी 20 वर्ल्ड कपमध्ये चिंतेचा विषय बनला होता. पण आता या सर्व चिंता संपल्या आहेत. भारतीय कॅप्टनने नेदरलँड विरुद्ध शानदार अर्धशतक झळकावलं. रोहितने 39 चेंडूत 53 धावा फटकावल्या. या इनिंग दरम्यान त्याने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
रोहित शर्माने नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात 3 षटकार लगावले. त्याने युवराज सिंहचा रेकॉर्ड मोडला. रोहित शर्मा टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे.
किती षटकार मारले?
रोहित शर्माने आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कपमध्ये 34 षटकार लगावले आहेत. त्याने 33 षटकार मारणाऱ्या युवराज सिंहला मागे टाकलं. रोहित शर्मानंतर विराट कोहलीच्या नावावर 24 षटकार आहेत. टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 63 सिक्स मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.
टी 20 वर्ल्ड कपमध्ये किती धावा?
रोहित शर्माने टी 20 वर्ल्ड कपमध्ये 900 धावा सुद्धा पूर्ण केल्या आहेत. त्याने श्रीलंकेच्या तिलकरत्न दिलशानला मागे टाकलं. त्याच्या नावावर 897 धावा होत्या. रोहित या यादीत आता चौथ्या स्थानावर आहे.
म्हणून रोहित शर्मासाठी ही हाफ सेंच्युरी खास
रोहित शर्मासाठी ही इनिंग महत्त्वाची होती. कारण 10 मॅचनंतर त्याने अर्धशतक झळकावलं. त्याने शेवटच अर्धशतक दुबईत आशिया कप स्पर्धेत झळकावलं होतं. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये फ्लॉप ठरला. वर्ल्ड कपच्या वॉर्म अप मॅचमध्येही त्याची बॅट तळपली नाही.