मुंबई: इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) उद्यापासून सुरु होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळणार नाहीय. रोहित शर्मा अजूनही कोरोनामधुन पूर्णपणे बरा झालेला नाही. गुरुवारी त्याची एंटीजेन टेस्ट करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्याजागी जसप्रीत बुमराह संघाचं नेतृत्व करेल. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. भारत आणि इंग्लंड मध्ये बाकी राहिलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. भारत या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. काल मीडिया रिपोर्ट्स मध्ये रोहित शर्मा खेळणार नसल्याचं म्हटलं होंत. पण त्यानंतर हेड कोच राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत रोहित शर्माच्या खेळण्याची शक्यता नाकारलेली नव्हती. रोहित शर्माच्या अजून दोन चाचण्या बाकी आहेत. या चाचण्यांच्या रिपोर्ट्सवर तो खेळणार की, नाही ते स्पष्ट होईल, असं द्रविड म्हणाले होते. अखेर रोहित शर्मा खेळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
संघामध्ये रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत यांच्यासारखे खेळाडू असतानाही, जसप्रीत बुमराहच्या नावाचा कॅप्टनशिपसाठी विचार का होतोय? त्यामागे काही कारणं आहेत. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, कॅप्टनशिपसाठी आर. अश्विन आणि ऋषभ पंतच्या नावाची चर्चा झाली. पण शिक्कामोर्तब बुमराहच्या नावावरच झालं. आर.अश्विन आणि ऋषभ पंतला कॅप्टन न बनवण्यामागे एक कारण आहे. अश्विनला नुकताच कोविड झाला होता. त्यातून तो सावरतोय. हे त्याला कॅप्टन न बनवण्यामागचं एक कारण आहे. त्याशिवाय अश्विन इंग्लंड विरुद्ध मागच्या चार कसोटी सामन्यात खेळलाही नाहीय. ऋषभ पंतला अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कॅप्टनशिपची संधी दिली होती. पण त्याचा खराब रेकॉर्ड कॅप्टनशिपच्या मार्गात आडवा आला. दुसऱ्याबाजूला जसप्रीत बुमराह फिट आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक मोठा अनुभव त्याच्याकडे आहे. त्यामुळे बुमराहच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलय.
इंग्लंडने भारताविरुद्धची सीरीज वाचवण्यासाठी पाच नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. हे पाचही खेळाडू याच सीरीजच्या मागच्या चार सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचा भाग नव्हते. यजमानांनी जवळपास आपला संघच बदलला आहे.
इंग्लंडकडून प्लेइंग 11 जाहीर
इंग्लंडचा संघ – जॅक लीच, पॉट्स, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स, एलेक्स लीस, जॅक क्रॉले, ऑली पॉप, ज्यो रुट, जॉनी बेयरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन