मुंबई : टीम इंडियात नेतृत्वबदल झाल्यानंतर अनेक महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. टीम इंडिया आता नव्या नेतृत्वात खेळणार आहे. कारण विराट कोहलीचं वनडे आणि टी-20 चं कर्णधारपद काढून रोहित शर्माला देण्यात आले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीमला चांगले यश मिळाले, मात्र त्याला एकही विश्वकप जिंकता आला नाही. त्यामुळे टीममध्ये नेतृत्वबदलाचे वारे गेल्या काही दिवसांपासून होते. आता नेतृत्वबदल झाल्यानंतर पडद्यामागच्या काही गोष्टींचा उलगडा सुरू व्हायला सुरूवात झाली आहे.
रोहितने सिलेक्टर्सकडे केलेली ही मागणी
रोहित शर्माने निवड समितीपुढे काही अटी ठेवल्या होत्या. टी-20 किक्रेटचा कर्णधार रोहित शर्माला बनवण्याचे स्पष्ट झाल्यावर, फक्त टी-20 या एका फॉरमॅटचा कर्णधार होण्यास रोहितने नकार दिला होता, अशी माहिती समोर येत आहे. त्याने निवडसमितीपुढे वनडेच्या कर्णधारपदाचीही अट ठेवली होती. एका रिपोर्टनुसार रोहितने निवडसमितीसोबत झालेल्या बैठकीत ही अट ठेवली होती. 8 डिसेंबरला विराट कोहलीला हटवून रोहित शर्माला कर्णधार पद सोपण्यात आले, म्हणजेच रोहित शर्माची अट निवडसमितीला मान्य करावी लागली आहे.
रोहितची कर्णधारपदाची कामगिरी उत्तम
रोहित शर्माची कर्णधारपदाची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना, मुंबईला 5 आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. त्यामुळे रोहितला कर्णधारपद देणे सहाजिक होते. रोहितच्या नेतृत्वात भारताने विराट कोहली टीममध्ये नसताना आशिय कप जिंकला आहे. तर रोहितने निधास ट्रॉफीही टीमला जिंकून दिली आहे. त्यामुळे रोहितचा दबदबा चांगलाच वाढला होता. रोहितने व्हाईट बॉल क्रिकेटमध्येही उत्तम कामगिरी केली आहे.