मुंबई: जोस बटलर (Jos Buttler) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. समोर कुठलाही संघ किंवा गोलंदाज असला, तरी बटलरच्या बॅटमधून धावांचा ओघ सुरुच असतो. आज कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात पुन्हा प्रचिती आली. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पाठोपाठ जोस बटलरने आज केकेआर विरुद्ध शानदार शतक झळकावलं. यंदाच्या सीजनमधलं त्याचं हे दुसर शतक आहे. जोस बटलरने केकेआरच्या (KKR) कुठल्याही गोलंदाजाला दया-माया दाखवली नाही. त्याने प्रत्येक गोलंदाजाचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. जोस बटलरच्या फलंदाजीमुळे केकेआर विरुद्ध राजस्थानचा संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. जोस बटलरने नेहमीप्रमाणे पहिली दोन षटक सावधपणे खेळून काढली. पण त्यानंतर त्याने रंगात येत उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, पॅट कमिन्ससह केकेआरच्या अन्य गोलंदाजांचा समाचार घेतला.
बटलरला कोणी थांबवेल? किंवा रोखू शकेल? असं कुठल्याही गोलंदाजाकडे पाहून वाटलं नाही. जोस बटलर सहजतेने धावा वसूल करत होता. त्याने पहिल्या विकेटसाठी देवदत्त पडिक्कल सोबत 97 धावांची भागीदारी केली. त्यानंतर संजू सॅमसनोसबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी 67 धावा जोडल्या. जोस बटलरच्या तुफानासमोर कोलकात्याचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. बटलरला कुठल्या टप्प्यावर बॉल टाकायचा, असा प्रश्न कोलकात्याच्या गोलंदाजांना पडला होता. कारण बटलरच्या बॅटमधून चौकार, षटकार सहज निघत होते. त्याने पॅट कमिन्सला षटकार ठोकून शतक पूर्ण केलं.
बटलर त्याच 17 व्या षटकात कमिन्सच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना बाद झाला. जोस बटलरने 61 चेंडूत 103 धावा केल्या. यात नऊ चौकार आणि पाच षटकार होते. कमिन्सच्या गोलंदाजीवर वरुणने त्याचा झेल पकडला. याआधी जोस बटलरने मुंबई इंडियन्स विरुद्ध 100 धावांची शतकी खेळी केली होती. बटलरने आज 168 पेक्षा जास्तच्या स्ट्राइक रेटने धावा फटकावल्या. त्याने 59 चेंडूत शतक पूर्ण केलं.