मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) च्या क्वालिफायर 2 मध्ये उद्या राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (RR vs RCB) सामना होणार आहे. उद्या जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल, तर हरणाऱ्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. राजस्थानचा संघ क्वालिफायरचा पहिला सामना हरला आहे, तर RCB ने लखनौवर विजय मिळवून क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. आता पुढचे दोन सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये दोन्ही संघांनी कामगिरी कशी केली, ते आता महत्त्वाचं नाही. आता प्लेऑफची स्टेज आहे. नशिबामुळे आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला, पण एलिमिनेटरमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने लखनौला हरवलं, ते पाहता राजस्थानसाठी हा सामना सोपा नाहीय. क्वालिफायर वन मध्ये गुजरात टायटन्सने राजस्थानला पराभूत केलं होतं. या जय-पराजयामुळे वाढलेल्या आणि खचलेल्या मनोबलाचा परिणाम सामन्यामध्ये दिसू शकतो.
क्वालिफायर 2 मध्ये तुम्ही दबाव कशा पद्धतीने हाताळता ते खूप महत्त्वाचं आहे. जो संघ चांगला खेळेल, तो विजय मिळवेल. दोन्ही संघ आयपीएलमध्ये परस्पराविरोधात 24 सामने खेळलेत. यात 13 RCB ने तर 11 राजस्थान रॉयल्सने जिंकलेत. हेच आकडे पाहून, मोहम्मद अझरुद्दीनने उद्या एक दमदार सामना पहायला मिळेल, असं म्हटलं आहे.
IPL 2022 च्या ग्रुप स्टेजमध्ये दोन्ही संघांमध्ये दोन सामने झालेत. दोन्ही टीम्सनी प्रत्येकी एक मॅच जिंकली आहे. मागचे पाच सामने पाहता, राजस्थान रॉयल्सची बाजू थोडी कमकुवत वाटतेय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये याआधी दोन्ही टीम्समध्ये एक मॅच झालीय. तो सामना RCB ने जिंकला होता. आकडे आरसीबीच्या बाजूने असले, तरी प्रत्येक सामना नवीन आहे. जो संघ सर्वोत्तम खेळेल, तोच फायनलमध्ये पोहोचेल.