मुंबई: IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्स पहिला फायनलिस्ट संघ आहे. दुसरा संघ कुठला असणार? त्याचा निर्णय आज शुक्रवारी होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दुसरा क्वालिफायरचा सामना होईल. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RR vs RCB) हे दोन संघ आमने-सामने असतील. आज जी टीम जिंकेल, ती रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध फायनलमध्ये खेळेल. गुजरातने क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात राजस्थानला नमवून फायनलमध्ये प्रवेश केला. पॉइंट्स टेबलमध्ये (Points Table) गुजरात आणि राजस्थान हे दोन संघ पहिल्या दोन स्थानांवर होते. त्यामुळे क्वालिफायरचा पहिला सामना या दोन टीम्समध्ये झाला. क्वालिफायरच्या पहिल्या मॅचमध्ये हरणाऱ्या संघाला फायनल गाठण्याची आणखी एक संधी मिळते. एलिमिनेटर खेळणाऱ्या संघाला फायनल गाठण्यासाठी क्वालिफायरचे दोन अडथळे पार करावे लागतात. आज करो या मरो अशा प्रकारचा सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपली सर्वोत्त प्लेइंग-11 मैदानात उतरवतील.
राजस्थानचा संघ 2008 पासून फायनलमध्ये खेळलेला नाही. बँगलोरच्या टीमने 2016 पासून फायनल गाठलेली नाही. त्यामुळे दोन्ही टीम्स फायनल खेळण्यासाठी आपली पूर्ण ताकत पणाला लावतील. राजस्थानचा मागच्या सामन्यात पराभव झाला होता. मागच्या चुकांमधून बोध घेऊन राजस्थान आज त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करेल. लखनौ विरुद्ध जी कामगिरी केली, तोच परफॉर्मन्स कायम ठेवण्याचा आरसीबीचा प्रयत्न असेल.
बँगलोरने मागच्या सामन्यात शानदार खेळ दाखवला. रजत पाटीदारने नाबाद 112 धावा केल्या. प्लेऑफमध्ये कुठल्या भारतीय खेळाडूने झळकावलेलं हे पहिलं शतक आहे. गोलंदाजांनीही बऱ्यापैकी कामगिरी केली. त्यामुळे बँगलोर आपल्या टीममध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे.
मागच्या सामन्यात राजस्थानची गोलंदाजी प्रभावी ठरली नाही. युजवेंद्र चहल आणि आर. अश्विनने अपेक्षित कामगिरी केली नाही. ओबेड मेकॉयही चालला नाही. तरीही राजस्थानच्या टीममध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.
दोन्ही टीम्सची संभाव्य प्लेइंग -11
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, महिपाल लोमरोड, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज,
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, आर.अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, ओबेड मेकॉय,