पुणे: महाराष्ट्राचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडने काल विजय हजारे ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये विक्रम केला. त्याने उत्तर प्रदेश सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध फलंदाजी करताना विक्रम रचले. ऋतुराजने काल 159 चेंडूत 220 धावा फटकावल्या. 10 चौकार आणि 16 षटकार लगावले. त्याचबरोबर ऋतुराजने शिवा सिंह टाकत असलेल्या 49 व्या षटकात 7 षटकार लगावले.
क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा ऋतुराज गायकवाड पहिला फलंदाज आहे. याआधी कोणालाही एकाच ओव्हरमध्ये 7 षटकार मारणं जमलेलं नाही. ऋतुराजने एकाच ओव्हरमध्ये 43 धावा लुटल्या.
आई-वडिलांशी संवाद
या अचाट कामगिरीबद्दल ऋतुराजवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय. त्याच्या या यशाने त्याच्या आई-वडिलांना आनंद होणं स्वाभाविक आहे. ऋतुराज गायकवाड मूळचा पुण्याचा पिंपरी-चिंचवडचा रहिवासी आहे. ऋतुराज गायकवाडच्या या यशस्वी कामगिरीबद्दल टीव्ही ९ मराठीने त्याच्या आई-वडिलांशी संवाद साधला.
ते ओळखण्याची जबाबदारी त्या पालकांची
“प्रत्येक बाळ जन्माला आल्यानंतर त्यात एक विशेष गुण असतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, अशी म्हणं आहे. फक्त आपलं बाळ कशात पारंगत होऊ शकतं, ती ओळखण्याची जबाबदारी त्या पालकांची असते” असं ऋतुराज गायकवाडचे वडिल म्हणाले. “लहान असतानाच, ऋतुराज चांगलं क्रिकेट खेळतोय, हे लक्षात आलं. त्यामुळे क्रिकेट क्षेत्र निवडल्यानंतर त्यात त्याला सपोर्ट केला” असं वडिल म्हणाले.
वाढदिवसाचा काय किस्सा आहे?
“ऋतुराजचा कालचा खेळ सर्वोच्च होता. त्याच्या रेकॉर्डवर आनंद आहे. भविष्यातही त्याने असाच खेळ खेळावा” अशी अपेक्षा वडिलांनी व्यक्त केली. वाढदिवसाला दिलेल्या गिफ्टचा किस्सा सांगताना वडिल म्हणाले की, “प्रत्येक आई-वडिल आपल्या मुलाला वाढदिवसाला गिफ्ट देत असतात. आम्ही त्याला क्रिकेटशी संबंधित गिफ्ट दिलं. आम्ही त्याच्यासोबत घरगुती वातावरणात खेळायचो. बहिण, आई, आम्ही चार-पाच वर्ष त्याच्यासोबत क्रिकेट खेळलो. त्याची प्रगती दिसत होती. त्यानंतर आम्ही त्याला वेंगसरकर क्रिकेट अकादमीत दाखल केलं”
ऋतुराजची आई काय म्हणाली?
ऋतुराजच्या आईने सुद्धा त्याच्या यशावर भावना व्यक्त केल्या. “मुलाच्या यशामध्ये आई-वडिलांना आनंद होत असतो. बऱ्याच गोष्टी असतात. गुरुजनांचे आशिर्वाद, वाडवडिलांची पुण्याई, त्यात त्याची कठोर मेहनत, परिश्रम सुद्धा आहेत” असं आई म्हणाली.
ऋतुराज अभ्यासात कसा होता?
ऋतुराज अभ्यासात कसा होता? या प्रश्नावर त्याच्या वडिलांनी सांगितलं की, “ऋतुराज क्रिकेट खेळत असला, तरी त्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं नाही. अभ्यासातही तो हुशात होता. आम्ही त्याचा घरीच अभ्यास घ्यायचो. क्रिकेट आणि अभ्यास यात समतोल राखला”