मुंबई: IPL 2022 स्पर्धा सुरु असताना, टीव्हीवर एक खास जाहीरात यायची. ग्राउंड्समनसाठी ही जाहीरात होती. सामन्याआधी खेळपट्टी, मैदान तयार करण्यासाठी हे ग्राउंड्समन (Groundsman) खूप मेहनत घेतात. अनेकदा खेळाडू सुद्धा ग्राउंड्समनची भरपूर स्तुती करतात. आयपीएल सामन्यांच्यावेळी ग्राउंड्समनचं भरपूर कौतुक झालं. तेच आता एका भारतीय खेळाडूने ग्राउंड्समनला खूप वाईट वागणूक दिल्याचं समोर आलं आहे. काल भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाचवा निर्णायक टी 20 सामना सुरु असताना हा प्रकार घडला. पावसामुळे नंतर हा सामना रद्द झाला. पण भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने असं काम केलं, ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड ही सलामीवीरांची जोडी मैदानात उतरली होती. सामना सुरु होणार, इतक्यात पाऊस कोसळला त्यामुळे सर्वच खेळाडूंना डग आउट मध्ये परतावे लागले.
ऋतुराज गायकवाड डगआउट एरियामध्ये बसला होता. त्यावेळी एक ग्राउंड्समन त्याच्याजवळ आला व सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यावेळी भारताच्या या युवा फलंदाजाने त्या ग्राउंड्समन बरोबर खूप खराब व्यवहार केला. ऋतुराजने त्या ग्राउंडसमनला आपल्यापासून दूर ढकललं व सेल्फी काढण्यासाठी मनाई केली. गायकवाडने शेजारी बसलेल्या खेळाडूच्या मागे आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. जेणेकरुन त्याला सेल्फी घेता येऊ नये.
Is this the way how you behave to elder person #RuturajGaikwad this is Very bad and disrespectful gesture. Sad to see these groundsmen getting treated like this? and even more sad is that we have to see this on NTV. @BCCI #INDvSA
pic.twitter.com/IjfLZRnMnl— Roshmi ➐ (@CricCrazyRoshmi) June 19, 2022
ऋतुराज गायकवाडचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याच्यावर बरीच टीका सुरु आहे. वयस्कर व्यक्तीसोबत अशा पद्धतीने वर्तणूक करण्याची ही कुठली पद्धत? असं एका युजरने लिहिलं आहे. ऋतुराज गायकवाड हे चुकीचं आहे. ग्राउंड्समन सोबत असा व्यवहार पाहून दु:ख झाला. त्याहीपेक्षा जास्त वाईट याचं वाटलं की, आम्ही सगळं हे टीव्हीवर पाहिलं. असं त्या युजरने म्हटलय. या संपूर्ण सीरीजमध्ये ऋतुराजला सगळ्या सामन्यांमध्ये संधी मिळाली. पण एक अर्धशतक वगळता त्याला छाप उमटवता आली नाही. कालचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्या मॅचमध्येही त्याने फक्त 10 धावा केल्या.