मुंबई: एमएस धोनीने (MS Dhoni) अनेक खेळाडूंना घडवलं. धोनीने ज्या खेळाडूंना शोधलं, त्यांनी नेहमीच सर्वोत्तम प्रदर्शनाचा प्रयत्न केला. या खेळाडूंनी स्वत:ची एक ओळख बनवली. अशाच खेळाडूंपैकी एक आहे ऋतुराज गायकवाड. टीम इंडियाकडून (Team India) खेळताना ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) अजूनही सूर गवसलेला नाही. पण अन्य टुर्नामेंटमध्ये या खेळाडूने नेहमीच दमदार प्रदर्शन केलय.
सर्विसेज विरुद्ध अप्रतिम इनिंग
हा खेळाडू आऊट ऑफ फॉर्म आहे, असं वाटतच नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाडने तुफानी शतक ठोकलं. आयपीएलमध्ये धोनीने ऋतुराज गायकवाडला संधी दिली. महाराष्ट्राकडून सर्विसेज विरुद्ध ऋतुराज गायकवाड एक अप्रतिम इनिंग खेळला.
त्याने एकट्यानेच सर्विसेजच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याच्या धुवाधार शतकाच्या बळावर महाराष्ट्राच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 185 धावा केल्या.
गायकवाडने 65 चेंडूत ठोकल्या 112 धावा
सर्विसेज विरुद्ध महाराष्ट्राने पहिली बॅटिंग केली. ऋतुराज गायकवाड सलामीला आला होता. त्याने 65 चेंडूत 112 धावा ठोकल्या. यात 12 चौकार आणि पाच षटकार होते. या इनिंगमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 172.30 होता. त्याने आपलं शतक 59 चेंडूत पूर्ण केलं. यात 11 चौकार आणि 4 षटकार होते. त्याच्या शतकामुळे महाराष्ट्र मजबूत स्थितीमध्ये आला.
17 चेंडूत 78 धावा
ऋतुराज गायकवाडने आपल्या शतकी इनिंगमध्ये 78 धावा फक्त 17 चेंडूत चोपल्या. त्याने षटकारामधून 30 धावा आणि चौकारांमधून 40 धावा केल्या. महाराष्ट्राकडून ऋतुराज शिवाय अन्य फलंदाज फार चालले नाहीत. दुसरा ओपनर यश नाहरने फक्त 1 धाव केली. राहुल त्रिपाठीने 19 धावा केल्या. नौशाद शेख 24 धावांसह टीममधील दुसरा हायेस्ट स्कोरर ठरला.