सेंच्युरियन: भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India vs South africa) रवाना होत असताना आणि त्याआधी बरेच वाद झाले. विराट कोहलीकडून (Virat kohli) वनडे कॅप्टनशीप काढून घेतल्यानंतर या वादांना सुरुवात झाली होती. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) विरुद्ध विराट कोहली असा सामना रंगला होता. कोण खरं आणि कोण खोटं असा प्रश्न पडला होता. पण आता हे सर्व वाद मागे सोडून टीम इंडिया आणि बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रीत केले आहे.
29 वर्षात सात दौऱ्यांमध्ये जे शक्य झालं नाही, ते शक्य करुन दाखवण्याचं टीम इंडियाचं लक्ष्य आहे. त्या दृष्टीनेच कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची तयारी सुरु आहे. आजपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या सावटाखाली ही मालिका होत आहे. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत पहिली कसोटी पार पाडणार आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने ओमायक्रॉम व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन तिकीट विक्री केलेली नाही.
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची संघनिवड कशी असणार? याची उत्सुक्ता आहे. विराट कोहली अजिंक्य रहाणेला संघात स्थान देणार? यावर बरीच चर्चा सुरु आहे. अजिंक्य रहाणेचा फॉर्म पाहता श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी योग्य पर्याय ठरु शकतात. पण परदेशातील खेळपट्ट्यांवरील अजिंक्य रहाणेची कामगिरी लक्षात घेता, अनुभवाला प्राधान्य द्यावे असा एक मतप्रवाह आहे. दक्षिण आफ्रिकेतील मागच्या दोन दौऱ्यांमध्ये रहाणेने तीन कसोटी सामन्यात दोन अर्धशतकांसह 266 धावा केल्या आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापन काय निर्णय घेते त्याची उत्सुक्ता आहे.
दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये इशांत शर्मा आणि शार्दुल ठाकूरमध्ये चुरस आहे. टीम इंडिया पाच गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. इशांत शर्माकडे अनुभव जास्त आहे. पण शार्दुल प्रसंगी उपयुक्त फलंदाजी सुद्धा करु शकतो ही जमेची बाजू आहे. यावर्षी शार्दुलने आपल्या कामगिरीने स्वत:ला सिद्ध सुद्धा केलं आहे. कसोटीत शादुर्लने तीन सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या आहेत तर 37.20 च्या सरासरीने 232 धावा केल्या आहेत. त्यामुळे इशांतऐवजी शार्दुलला पसंती मिळू शकते.
संबंधित बातम्या:
राज्यातल्या पहिल्या बैलगाडा शर्यतीप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदारावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल
Gopichand Padalkar : जयंत पाटील, सांगलीचे SP माझ्या हत्येच्या कटात सामील, गोपीचंद पडळकरांचा आरोप
AUS vs ENG, Ashes 3rd Test, Day 1: ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडची शरणागती