T20 World Cup 2024 : नेपाळची जबरदस्त झुंज, थरारक सामन्यात शेवटच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा 1 रन्सने विजय

| Updated on: Jun 15, 2024 | 9:16 AM

SA vs NEP T20 World Cup 2024 : ग्रुप डी मध्ये दक्षिण आफ्रिका आणि नेपाळमध्ये झालेला सामना T20 वर्ल्ड कप 2024 मधील सर्वात रोमांचक सामना होता, असं म्हटल्यास वावग ठरणार नाही. सामना सुरु होण्याआधी कोणाला असं वाटलं नसेल, नेपाळ विरुद्ध विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला इतका संघर्ष करावा लागेल.

T20 World Cup 2024 : नेपाळची जबरदस्त झुंज, थरारक सामन्यात शेवटच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा 1 रन्सने विजय
SA vs NEP T20 World Cup 2024
Image Credit source: PTI
Follow us on

नेपाळला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकता आलं नाही. पण त्यांनी आपल्यापेक्षा अनेक पटींनी बलाढ्य असलेल्या दक्षिण आफ्रिकेला जबरदस्त झुंज दिली. त्यासाठी नेपाळच कौतुक करावं तेवढं कमी आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे काहीही होऊ शकतं. एक क्षण सामन्यात असं वाटलं की, नेपाळ धक्कादायक निकालाची नोंद करेल. पण दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवासमोर नेपाळची हार झाली. ग्रुप डी मधील या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नेपाळला हरवलं. त्याशिवाय ग्रुप स्टेजमध्ये अजेय राहत दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 मध्ये पाऊल ठेवलं.

नेपाळने दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला जोरदार लढत दिली. त्यांनी ऑलराऊंडर खेळाच प्रदर्शन केलं. दक्षिण आफ्रिकेची टीम पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरली, तेव्हा नेपाळी टीमने गोलंदाजीत जलवा दाखवला. टार्गेट चेज करताना नेपाळने बॅटिंग कौशल्य दाखवत एक क्षण दक्षिण आफ्रिकेला टेन्शमध्ये आणलं.

दक्षिण आफ्रिकेला रोखणारे नेपाळचे ते दोन गोलंदाज कोण?

नेपाळी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना जखडून टाकलं. त्यांना मुक्तपणे फटकेबाजी करु दिली नाही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. परिणामी 20 ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रिकेने 7 बाद 115 धावा केल्या. कुशल भुर्थेल आणि दीपेंदर सिंह एरी या नेपाळच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला इतक्या कमी धावसंख्येवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांनी मिळून दक्षिण आफ्रिकेचे सात विकेट काढले. कुशलने 4 ओव्हरमध्ये 19 रन्स देऊन 4 विकेट काढले. त्याचवेळी दीपेंदर सिंहने तीन विकेट काढले.

नेपाळी टीमचा झुंजार बाणा

116 धावांच लक्ष्य T20 क्रिकेटमध्ये फार मोठ नाहीय. पण दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर नेपाळसाठी हे आव्हानात्मक टार्गेट होतं. नेपाळच्या टीमने झुंजार बाणा दाखवला. आव्हानाचा सामना केला. चांगला प्रयत्न केला. पण शेवटी त्यांना यश मिळू शकलं नाही.

शेवटच्या 5 ओव्हरमध्ये काय स्थिती होती?

एकवेळ नेपाळला शेवटच्या 5 ओव्हरमध्ये विजयासाठी 25 धावांची गरज होती. हातात 7 विकेट होत्या. सामन्याच पारड नेपाळच्या बाजूने झुकलं होतं. त्यानंतर 9 चेंडूत 16 धावांची गरज होती. दोन्ही टीम्सना विजयाची फिफ्टी-फिफ्टी संधी होती. नेपाळने प्रयत्न केले. अखेरीस 2 चेंडूत विजयासाठी 2 धावांची गरज होती. सामना खूपच थरारक बनला होता. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा अनुभव नेपाळवर भारी पडला. अखेरच्या 2 चेंडूत नेपाळला एकही धाव काढता आली नाही. परिणामी अवघ्या 1 रन्सच्या फरकाने दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला.