मुंबई : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शनिवारी अर्जुन तेंडुलकरच्या करीयरबद्दल आपले विचार व्यक्त केले. अलीकडेच अर्जुन तेंडुलकर IPL 2023 मध्ये खेळताना दिसला होता. त्याला काही सामन्यात मुंबई इंडियन्सकडून संधी मिळाली. अर्जुनने मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग करुन घेत आपला प्रभाव पाडला. अर्जुन तेंडुलकर हा सचिनचा मुलगा आहे. त्या दृष्टीनेच त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या जातात.
आता स्वत: सचिननेच मुलाच्या करीयरबद्दल आपले विचार व्यक्त केलेत. मी अर्जुनला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिलाय असं सचिनने सांगितलं. मुलांना आवश्यक तेवढं स्वातंत्र्य द्या, अशी विनंती सुद्धा सचिनने पालकांना केली.
सचिनने पालकांना काय विनंती केली?
अर्जुन तेंडुलकरने याचवर्षी मुंबई इंडियन्सकडून डेब्यु केला. “मला माझ्या कुटुंबाकडून सपोर्ट् मिळाला. माझा भाऊ अजित तेंडुलकर नेहमीच माझ्या पाठिशी होता. नितीन माझा दुसरा भाऊ वाढदिवसाला माझ्यासाठी पेटिंग काढायचा. माझी आई LIC मध्ये नोकरी करायची. माझे वडिल प्राध्यापक होते. त्यांनी मला स्वातंत्र्य दिलं. मी पालकांना विनंती करेन की, तुम्ही तुमच्या मुलांना स्वातंत्र्य द्या” असं सचिन तेंडुलकर म्हणाला.
अर्जुनबद्दल काय म्हणाला?
सचिन तेंडुलकर त्याच्यावर लिहिण्यात आलेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होता. “माझ्यासाठी जे वातावरण होतं, तसच वातवरण मी माझ्या मुलासाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही स्वत:च कौतुक कराल, तेव्हा लोक तुमचं कौतुक करतील. खेळाकडे लक्ष दे, असं मला माझे वडिल सांगायचे आणि आता हेच मी अर्जुनला सांगतोय” असं सचिन तेंडुलकर म्हणाला.
सचिन तेंडुलकरने पत्रकारांचे आभार का मानले?
“मी क्रिकेटमधून निवृत्त झालो, तेव्हा प्रसारमाध्यमांनी माझा सत्कार केला होता. त्यावेळी मी माडियाला अर्जुनला त्याचा वेळ द्या, त्याला क्रिकेटच्या प्रेमात पडू द्या अशी विनंती केली होती. पत्रकारांनी त्याला स्वातंत्र्य दिलं. यासाठी मी त्यांचा आभारी आहे” असं सचिन तेंडुलकर म्हणाला.