Prithvi Shaw controversy : टीम इंडियाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या वादात सापडला आहे. मुंबईत एका हॉटेलबाहेर पृथ्वी शॉ वर हल्ल्याचा प्रयत्न झाला. एक महिला आणि तिच्या सोबत असलेल्या काही जणांनी पृथ्वी व त्याच्या मित्रांवर हल्ला केला. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आहे. या वादाचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. ज्यात पृथ्वी एका महिलेला मारहाणीपासून रोखताना दिसतोय. पृथ्वीचा आधीच टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष सुरु असताना, तो एका नव्या वादात अडकलाय.
पृथ्वीसाठी हे संघर्षाचे दिवस आहेत. सोशल मीडियावर काही जणांनी पृथ्वीच समर्थन केलय. पण क्रिकेट विश्वातून आतापर्यंत कोणीही उघडपणे पृथ्वीच्या समर्थनासाठी पुढे आलं नव्हतं. या कठीण काळात आता पृथ्वीला एका खास व्यक्तीने समर्थन दिलय.
तेंडुलकरने मेसेजमध्ये काय म्हटलय?
मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ ला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने साथ दिलीय. अर्जुनने या कठीण काळात मित्रासाठी सपोर्टचा मेसेज पोस्ट केलाय. अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केलाय. यात “हिम्मत सोडू नकोस, मजबूत रहा. चांगल्या आणि वाईट काळात नेहमी तुझ्यासोबत आहे” असं अर्जुनने त्याच्या मेसेजमध्ये म्हटलय. अर्जुनने पृथ्वीसोबतचा बालपणीचा एक फोटोही पोस्ट केलाय.
बेसबॉलच्या बॅटने मारहाणीचा प्रयत्न
बुधवारी 15 फेब्रुवारीला मुंबईत एका पबमध्ये पृथ्वीसोबत फोटो काढण्यावरुन वाद झाला. भारतीय क्रिकेटर आणि त्याच्या मित्रांच इंफ्लुएंसर सपना गिल आणि तिच्या मित्रांसोबत भांडण झालं. मारहाणीपर्यंत हे प्रकरण पोहोचलं. पबच्या बाहेर पृथ्वी स्वत:ला वाचवण्यासाठी आरोपी मुलीच्या हातून बेसबॉलची बॅट काढून घेताना दिसला.
सपना गिल अटकेत
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पृथ्वी आणि त्याच्या मित्रांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केलीय. 8 लोकांनी मिळून गाडीवर हल्ला केला व मारहाणीचा प्रयत्न केला असा आरोप आहे. पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. इंफ्लुएंसर सपना गिलला पोलिसांनी अटक केलीय.