Sachin Tendulkar: वयाच्या 49 व्या वर्षी सुद्धा क्रिकेटचा देव तसाच खेळतो, त्याचा स्कूप, कव्हर ड्राइव्ह एकदा बघाच VIDEO

| Updated on: Sep 20, 2022 | 12:46 PM

मॅच रद्द झाली पण सचिनने मन जिंकलं. त्याचे हे दोन फटके बघाच.

Sachin Tendulkar: वयाच्या 49 व्या वर्षी सुद्धा क्रिकेटचा देव तसाच खेळतो, त्याचा स्कूप, कव्हर ड्राइव्ह एकदा बघाच VIDEO
Sachin-Tendulkar
Image Credit source: (Road Safety World Series Photo)
Follow us on

मुंबई: सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज सुरु आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू खेळत आहेत. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळतोय. सचिन इंडिया लिजेंडस टीमकडून खेळतोय. काल न्यूझीलंड लिजेंडस विरुद्ध सामना होता. त्यावेळी सचिन ओपनिंगला आला होता. सचिन आता 49 वर्षांचा आहे. सचिन वयाच्या पन्नाशीकडे जातोय.

पाहत रहावी अशी फलंदाजी

खरंतर या वयातही सचिनच्या फलंदाजीत ती नजाकत अजूनही टिकून आहे. काल काही षटकांच्या खेळानंतर सामना पावसामुळे रद्द झाला. अवघ्या सहा ओव्हर्सचा खेळ झाला. पण सचिन खेळपट्टीवर असेपर्यंत पाहत रहावी अशी फलंदाजी त्याने केली.

ते चार चौकार लाजवाब

एखादा फलंदाज वर्षानुवर्ष मैदानावर घाम गाळून क्लास कमावतो. सचिनच्या फलंदाजीत तो क्लास अजूनही टिकून आहे. काल सामना थांबण्यात आला, तेव्हा सचिन 13 चेंडूत 19 धावांवर खेळत होता. या 19 धावा करताना सचिनने जे चौकार लगावले, ते खूपच लाजवाब होते.


कडक बॅकफूट कव्हर ड्राइव्ह

न्यूझीलंड लिजेंडसने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. सचिन नमन ओझासोबत सलामीला आला होता. डावाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये सचिनने कायली मिल्सला कडक बॅकफूट कव्हर ड्राइव्ह मारला. पुढच्याच ओव्हरमध्ये शेन बॉन्डच्या गोलंदाजीवर त्याने पुलच्या फटक्यावर चौकार मारला. त्यानंतर सचिनने मिल्सच्या गोलंदाजीवर स्कूप फटका खेळून चौकार लगावला.

पावसाने उधळूव लावली इच्छा

सचिनची दमदार फलंदाजी पाहण्याची इच्छा पावसाने उधळून लावली. सचिनचे हे चार चौकार म्हणजे चाहत्यासाठी एक मेजवानीच होती. सचिन तेंडुलकर आणि नमन ओझा सलामीलासाठी उतरले होते. फक्त 5.5 ओव्हर्सचा खेळ झाला. सामना थांबवण्यात आला, त्यावेळी इंडिया लिजेंडसच्या एक विकेट गमावून 49 धावा झाल्या होत्या. सचिन 19 आणि सुरेश रैना 9 धावांवर खेळत होता.