मुंबई: टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) ऑक्टोबरमध्ये होणार आहे. यंदा हा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होत आहे. या वर्ल्ड कपच्या दृष्टीने टीम इंडियाने आधीपासूनच तयारी सुरु केली आहे. वेगवेगळ्या टी 20 मालिकांमध्ये बीसीसीआयच्या निवड समितीने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. जेणेकरुन, संघ निवडीसाठी चांगले पर्याय उपलब्ध राहतील. मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये भारताचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं होतं. यंदा अशी नामुष्की नकोय. त्यासाठी बीसीसीआयने (BCCI) आधीपासूनच जोरदार तयारी केलीय. टी 20 क्रिकेटमध्ये अनेक पर्याय आज भारतासमोर उपलब्ध आहेत. अनेक सीनियर खेळाडूंना (Senior Players) सुद्धा संघातील आपल स्थान पक्क असं, मानता येणार नाही. कारण स्पर्धाच तितकी तीव्र आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठी कसा संघ असेल? कोणाला संधी मिळेल? या बद्दल वेगवेगळे क्रिकेट एक्सपर्ट आतापासूनच आपलं मत प्रदर्शन करत आहेत. संजय मांजरेकर यांनी मांडलेलं मत, तर खूपच धक्कादायक आहे. क्रिकेट चाहत्यांना कदाचित ते पटणार ही नाही.
संजय मांजरेकरांच्या मते, रवींद्र जाडेजाला टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात जागा मिळणं कठीण आहे. “मागच्या काही दिवसात दिनेश कार्तिकने दाखवून दिलय की, तो 6 व्या आणि 7 व्या नंबरवर फलंदाजी करु शकतो. टी 20 क्रिकेटमध्ये दिनेश कार्तिक जी कामगिरी करतोय, ती खूपच प्रभावी आहे” असं संजय मांजरेकर यांचं मत आहे.
“रवींद्र जाडेजा सारख्या ऑलराऊंडरला संघात स्थान मिळणं, कठीण होऊन बसेल. तेच अक्षर पटेल सारखे खेळाडू पुढे निघून जाऊ शकतात” असं संजय मांजरेकर म्हणतात. “आता हार्दिक पंड्या परत आलाय. दिनेश कार्तिकही आहे. मधल्या फळीत ऋषभ पंत आहे” असं संजय मांजरेकर म्हणाले.
रवींद्र जाडेजा उत्तम ऑलराऊंडर आहे. आयपीएल 2022 त्याच्यासाठी खूपच वाईट ठरलं. त्याला फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात आपला ठसा उमटवता आला नाही. पण सीएसकेची कॅप्टनशिप त्याला मध्यावरच सोडावी लागली. फ्रेंचायजी बरोबर त्याचा वाद झाल्याच्या बातम्या आल्या. निश्चित एक खेळाडू म्हणून हे सर्व मनोधैर्य खच्ची करणार होतं. आयपीएलच्या आधी श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत रवींद्र जाडेजाने जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. त्याने उत्तम ऑलराऊंडरचा खेळ दाखवला होता. आता इंग्लंड दौऱ्यात त्याच्यासमोर स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान आहे.