मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये टी 20 सीरीज मधला चौथा सामना शनिवारी खेळला जाणार आहे. अमेरिकेच्या लॉडरहिल येथे हा सामना होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन काय असणार? हा मोठा प्रश्न आहे. पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. पहिला सामना भारताने जिंकला, दुसरा वेस्ट इंडिजने आणि तिसऱ्या सामन्यात पुन्हा भारताने विजय मिळवला. भारतीय संघाने याआधी इंग्लंड विरुद्धची टी 20 मालिकाही 2-1 ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियात ऑक्टोब-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप आधी भारतीय संघाला जास्तीत सराव व्हावा, यासाठी टी 20 मालिकांची आखणी करण्यात आली आहे.
चौथ्या टी 20 सामन्यात भारतीय संघात काही बदलही दिसू शकतात. भारताने आपली बेंच स्ट्रेंथ बळकट करण्यावर भर दिला आहे. त्यातून अजून नवीन चांगले खेळाडू गवसू शकतात. कॅप्टन रोहित शर्माला तिसऱ्या टी 20 सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या खेळण्याबद्दल सस्पेन्स कायम आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रोहित शर्मा फिट झाला आहे. त्याला कमरेच्या दुखण्याचा त्रास होत नाहीय. पण टीम मॅनेजमेंट रोहित शर्मा बाबत धोका पत्करणार नाही, अशी माहिती आहे. रोहित शर्मा 100 टक्के फिट असेल, तरच तो चौथ्या टी 20 सामन्यात खेळताना दिसेल.
श्रेयस अय्यरला बाहेर बसवलं जाईल, अशी चर्चा आहे. तो तिन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलाय. त्याच्याजागी संजू सॅमसनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. संजू सॅमसनचा शेवटच्या क्षणी टी 20 संघात समावेश करण्यात आला होता. भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलही फिट झालाय. त्याला चौथ्या सामन्यात संधी मिळू शकते. भुवनेश्वर कुमारला आराम दिला जाऊ शकतो. हर्षल दुखापतीमुळे बाहेर होता. त्याशिवाय कुलदीप यादवलाही संधी मिळू शकते.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेवन- रोहित शर्मा (कॅप्टन), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, आर अश्विन, अर्शदीप, हर्षल पटेल आणि कुलदीप यादव.