मुंबई: टीम इंडियाला (Team india) पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून (IND vs SA) पराभव स्वीकारावा लागला. या मॅचमध्ये संजू सॅमसनने (Sanju Samson) टीमला विजय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. संजू सॅमसन नाबाद राहिला. पण तो टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. संजू नाबाद 86 धावांची इनिंग खेळला. शेवटच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला विजयासाठी 31 धावांची आवश्यकता होती.
तरी मी ते केलं असतं
टीम इंडियाने हा सामना 9 धावांनी गमावला. लास्ट ओव्हरमध्ये मला चार चेंडूंवर चार षटकार मारावे लागले असते, तरी मी ते केलं असतं, असं संजूने सामन्यानंतर सांगितलं.
संजूच्या डोक्यात काय विचार होता?
संजूने लास्ट ओव्हरमध्ये तीन चौकार आणि एक षटकार लगावला. शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये टीम इंडियाला विजयासाठी 38 धावांची गरज होती. पण त्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्या. त्यामुळे टीम इंडियाला अखेरच्या ओव्हरमध्ये 31 धावांची गरज होती. सामन्यानंतर संजूने, तो काय विचार करत होता, त्याबद्दल सांगितलं.
दोन शॉट्स कमी पडले
संजू म्हणाला की, “मी खूप प्रयत्न केले. पण दोन शॉट्स कमी पडले. विकेटवर जास्तीत जास्त वेळ थांबणं मला आवडतं. पण खेळताना मॅच जिंकण्याचा उद्देश असतो. फक्त दोन शॉट कमी पडले. पुढच्यावेळी मी चांगल्या पद्धतीने मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करीन”
अशी होती प्लानिंग
संजू शेवटपर्यंत क्रीजवर होता. तो टीमला विजय मिळवून देईल, असा विश्वास होता. लास्ट ओव्हरमध्ये संजूच्या डोक्यात काय विचार होता? त्याचं काय प्लानिंग होतं? याबद्दल संजूला विचारणा करण्यात आली. “त्यांचे गोलंदाज चांगली बॉलिंग करत होते. तबरेज शम्सी महागडा ठरत होता. त्यावेळी आम्ही त्याला टार्गेट करण्याचा विचार केला. त्याची एक ओव्हर बाकी होती. 24 धावांची गरज असेल, तर मी चार षटकार मारु शकतो, हे मला माहित होतं. मला हा आत्मविश्वास होता. म्हणून लास्टपर्यंत क्रीजवर होतो”