मुंबई: निवड समिती आता सर्फराज खानकडे (Sarfaraz Khan) अजून दुर्लक्ष करणार नाही. मागच्या दोन सीजनपासून रणजी आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये सर्फराज खान खोऱ्याने धावा करतोय. रणजी फायनलमध्येही (Ranji Final) सर्फराज खानने शतक ठोकलय. सध्या मुंबई आणि मध्य प्रदेशच्या टीम मध्ये बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजी फायनल सुरु आहे. काल दुसऱ्यादिवशी सर्फराज खानने शतकी खेळी साकारली. त्याने महत्त्वाच्या सामन्यात 134 धावा फटाकवल्या. मुंबईचा डाव अडचणीत असताना त्याने हे प्रदर्शन केलं. त्यामुळेच मुंबईच्या संघाला (Mumbai Team) पहिल्या डावात 374 पर्यंत मजल मारता आली. सर्फराज आता 24 वर्षांचा आहे. मध्य प्रदेश विरुद्ध शतक ठोकल्यानंतर काल त्याच्या डोळ्य़ात अश्रू होते. सर्फराज खान या गुणी फलंदाजांकडे निवड समितीने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप झालाय. पण यापुढे असं होणार नाही. सर्फराज लवकरच भारतीय संघातून खेळताना दिसू शकतो. सर्फराजला टीम इंडियात संधी मिळू शकते.
नोव्हेंबर महिन्य़ात बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सर्फराजची भारतीय संघात निवड होईल. टाइम्स ऑफ इंडियाने विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. या रणजी मोसमातील सर्फराजची ही चौथी शतकी खेळी आहे. सहा सामन्यात 133.85 च्या सरासरीने त्याने आतापर्यंत 937 धावा केल्या आहेत. यात चार शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्यापाठोपाठ चेतन बिष्टने नागालँडकडून खेळताना 623 धावा केल्या आहेत. मागच्या 2019-20 च्या सीजनमध्ये सर्फराजने 154.66 च्या सरासरीने 928 धावा केल्या होत्या.
रणजी सीजनमध्ये फक्त दोन फलंदाजांनी दोनवेळा 900 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अजय शर्मा आणि वसीम जाफर हे ते दोन फलंदाज आहेत. “आता सर्फराजकडे दुर्लक्ष करणं कठीण आहे. त्याची कामगिरीच त्याच्यातील क्षमतेचा परिचय देतेय. बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेसाठी संघ निवडताना, त्याची खात्रीलायक निवड होईल. मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेत भारतीय ‘अ’ संघाकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती. तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे” असं बीसीआयमधील विश्वसनीय सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं.
रणजी करंकड 2022 मध्ये शतक झळकावल्यानंतर निवडकर्ते सुनील जोशी आणि हरविंदर सिंह यांनी सर्फराजशी चर्चा केली. सुनील जोशी आणि हरविंदर सिंह यांनी त्याच्या खेळीच कौतुक केल्याचं सर्फराजने सांगितलं.