Ranji Trophy: 41 वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबईला रणजी ट्रॉफीमध्ये मोठा झटका

| Updated on: Dec 30, 2022 | 5:27 PM

Ranji Trophy: मुंबईचे फक्त दोन प्लेयर लढले, अन्य बॅट्समनकडून निराशा. कुठल्या टीमने मुंबईला हरवलं?

Ranji Trophy: 41 वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबईला रणजी ट्रॉफीमध्ये मोठा झटका
Ranji Trophy
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: रणजी ट्रॉफी स्पर्धेत एकवेळ मुंबईचा दबदबा होता. मुंबईच्या टीमची एक दहशत होती. रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक 41 वेळा मुंबईच्या टीमने विजेतेपद मिळवलय. पण रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या टीमची आता ती हुकूमत राहिलेली नाहीय. आज सौराष्ट्राच्या टीमने मुंबईला हरवलं. सौराष्ट्राच्या टीमने मुंबईसमोर विजयासाठी 280 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. पण मुंबईचा डाव 231 धावांवर आटोपला. सौराष्ट्राच्या विजयात युवराजसिंह डोडिया आणि पार्थ भुट यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. दोघांनी प्रत्येकी चार-चार विकेट काढल्या. मुंबईचा पराभव चौथ्यादिवशी जवळपास निश्चित होता. सौराष्ट्राला आज शुक्रवारी विजयासाठी फक्त दोन विकेटची गरज होती.

सात ओव्हर्समध्ये मुंबईचा डाव आटोपला

आज सात ओव्हर्समध्ये सौराष्ट्राने मुंबईच्या शिल्लक दोन विकेट काढून विजय मिळवला. मुंबईने तृषार देशपांडेच्या रुपात आपला नववा विकेट गमावला. तृषारला धर्मेंद्र सिंह जाडेजाने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. डोडियाने शम्स मुलानीला आऊट करुन मुंबईचा डाव आटोपला.

मुंबईचे हे दोन फलंदाज लढले

दुसऱ्या इनिंगमध्ये मुंबईकडून पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवची बॅट चालली. शॉ ने पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगची ताकत दाखवली. त्याने 99 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह 68 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने चांगली फलंदाजी केली. तो अर्धशतक झळकवू शकला नाही. सूर्या 38 रन्सवर आऊट झाला. मुलानीने 70 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 34 धावा केल्या.


या सीजनमधला पहिला विजय

सैौराष्ट्रासाठी धर्मेंद्र सिंह जाडेजाने दोन विकेट घेतल्या. चेतन साकरिया आणि चिराग जानीला एकही विकेट मिळाली नाही. सौराष्ट्राचा या सीजमधला हा पहिला विजय आहे. याआधी सौराष्ट्राचे आसाम आणि महाराष्ट्रा विरुद्धचे सामने ड्रॉ झाले होते.

अशी होती पहिली इनिंग

सौराष्ट्राने या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग केली. त्यांनी 289 धावा केल्या. अर्पित वासवाडाने 155 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. शेल्डन जॅक्सनने 71 चेंडूत 47 धावा केल्या. आपल्या इनिंगमध्ये त्याने पाच चौकार आणि दोन षटकार लगावले. मुंबईच्या पहिल्या इनिंगमध्ये सूर्यकुमार यादवने जबरदस्त बॅटिंग केली. त्याची शतकाची संधी हुकली. त्याने 107 चेंडूत 14 चौकार आणि एक षटकार खेचला. सर्फराज खानने अर्धशतक झळकावलं. त्याने 121 चेंडूत 75 धावा केल्या. सर्फराजने सात चौकार आणि एक षटकार खेचला.