मुंबई: टॉप सीडेड नोव्हाक जोकोव्हिचने (Novak Djokovic) आठव्यांदा विम्बल्डन (Wimbledon) टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात त्याने 9 व्या सीडेड ब्रिटनच्या कॅमेरून नॉरीवर (Cameron Norrie) 2-6, 6-3, 6-2 आणि 6-4 असा विजय मिळवला. विम्बल्डनची सेमी फायनल मॅच खेळणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचसाठी सुरुवात चांगली झाली नाही. पहिला सेट त्याने गमावला. पण त्यानंतर जोकोव्हिचने आपल्या खेळात सुधारणा केली. त्याने सलग तीन सेटसह सामना जिंकला. नोव्हाक जोकोव्हिचने सलग चौथ्यांदा विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली आहे. विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची जोकोव्हिचची ही आठवी वेळ आहे. अंतिम फेरीत त्याच्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसचे आव्हान असेल. नवव्या सीडेज नॉरीने दमदार सुरुवात केली होती. नोव्हाक जोकोव्हिचला तो धक्का देईल, असं वाटत होतं. नॉरीने आक्रमक खेळताना पहिला सेट ६-२ असा जिंकला. त्याने या सेटमध्ये दोन वेळा जोकोव्हिचची सव्र्हिस भेदली.
पहिल्या सेट मध्ये जोकोव्हिचने केलेल्या चुकांचा नॉरीने फायदा उचलला व पाच गेमसह सेट जिंकला. पण त्यानंतर जोकोव्हिचने आपला खेळ उंचावला. दुसऱ्या सेटच्या आठव्या गेम मध्ये जोकोव्हिचने नॉरीची सर्व्हीस भेदली. त्यानंतर जोकोव्हिचने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. मागे वळून पाहिलं नाही. जोकोव्हिचने त्यानंतर पुढचे तीन सेट 6-3, 6-2 आणि 6-4 असे जिंकले.
सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच टेनिस विश्वातील सर्वोत्तम खेळाडू आहे. सेमीफायनलच्या सामन्यातही त्याने त्याच्या लौकीकाला साजेसा खेळ केला. 32 व्यां दा त्याने ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. रविवारी 21 वी ग्रॅण्ड स्लॅम चॅम्पियनशिप जिंकण्याच्या इराद्याने तो विम्बल्डन कोर्टवर उतरेल.
स्पेनच्या झुंजार राफेल नदालने टेलर फ्रिट्झला नमवून विम्बल्डनच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला होता. पण दुखापतीमुळे त्याने माघार घेतली. त्यामुळे सेमी फायनल न खेळताच ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसचा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश झाला. रविवारी टेनिस चाहत्यांना नदाल-जोकोव्हिच सामन्याचा थरार अनुभवता येणार नाही.