मुंबई: जागतिक क्रिकेटमध्ये (World cricket) कुठला हॉट टॉपिक असेल, तर तो आहे विराट कोहलीचा (Virat kohli) फॉर्म. सामने, स्पर्धा, सीरीज सगळं काही बदलतय, पण काही चेंज होत नसेल, तर तो आहे विराट कोहलीचा फॉर्म. मागच्या दोन वर्षात विराटच्या बॅटमधून शतक निघालेलं नाही. सध्या प्रत्येक सामन्यानंतर विराटच्या बाद होण्याची चर्चा रंगते. विराटही आता स्वत:च्या नशिबाला दोष देत असेल. 2016 सालच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीचा जो फॉर्म होता, तशाच फॉर्मची आता चाहत्यांना त्याच्याकडून अपेक्षा आहे. विराटचा खराब फॉर्म कधी संपणार? हे एक कोडच आहे. दरम्यान आता पाकिस्तानातून (Pakistan) विराटसाठी एक खास संदेश आला आहे. या संदेशात प्रार्थना जास्त आहे. विराट कोहलीला त्याचा फॉर्म परत मिळाला, एवढीच इच्छा आहे. कारण तरच 23 ऑक्टोबरच्या सामन्याची मजा आहे.
तुम्ही विचार करत असाल, 23 ऑक्टोबरला असं काय आहे?. 23 ऑक्टोबरला मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने असतील. T 20 वर्ल्ड कपमधील दोन्ही संघांमधील पहिला सामना असेल. दोन्ही संघ आपल्या पूर्ण ताकतीनिशी मैदानावर उतरावेत, अशी पाकिस्तानच्या एका गोलंदाजाची इच्छा आहे. भारताची मुख्य ताकत आहे विराट कोहली, जो सध्या फॉर्ममध्ये नाहीय.
पाकिस्तानी गोलंदाज शादाब खानने विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल भाष्य केलं आहे. पाकिस्तानी मीडियासोबत बोलताना शादाबने विराटच्या फॉर्म बद्दल मोठं वक्तव्य केलं. विराट कोहलीचं फॉर्ममध्ये नसणं पाकिस्तानच्या फायद्याचं आहे की, तो फॉर्ममध्ये आला पाहिजे, असा प्रश्न शादाब खानला विचारण्यात आला.
त्यावर त्याने “एक खेळाडू म्हणून विराट कोहली फॉर्ममध्ये आला पाहिजे, असंच मी म्हणेन. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने बऱ्याच धावा केल्या आहेत. भारताला अनेक सामने जिंकवून दिलेत. तो फॉर्ममध्ये असेल, तर मजा येईल.” शादाब पुढे म्हणाला की, “क्रिकेट टीम गेम आहे. एका खेळाडूच्या प्रदर्शनाने जय-पराजय ठरत नाही. सर्वांनाच योगदान द्यावं लागतं. संघाचा पराभव झाल्यास, सर्व खेळाडूंची जबाबदारी असते”