मेलबर्न: पाकिस्तान टीमने T20 वर्ल्ड कप 2022 गमावलाच. पण त्याचसोबत त्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शाहीन शाह आफ्रिदीला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर आहे. तो पुढचे काही महिने क्रिकेट खेळू शकणार नाहीय. कॅच पकडताना शाहीन शाह आफ्रिदीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे फायनलमध्ये तो आपल्या कोट्याची 4 ओव्हर्स टाकू शकला नाही. पाकिस्तानी टीमला याचा फटका बसला व फायनल मॅच त्यांनी गमावली.
कधीपर्यंत क्रिकेट खेळता येणार नाहीय?
शाहीन शाह आफ्रिदी पुढचे साडेतीन महिने क्रिकेट खेळू शकणार नाहीय. तो इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडची टीम पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ते कसोटी मालिका खेळतील.
पहिल्यांदा कधी दुखापत झालेली?
शाहीन आफ्रिदीला दुसऱ्यांदा गुडघे दुखापत झाली आहे. शाहीनला यावर्षी जुलै महिन्यात गॉल कसोटी दरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या आधी तो दुखापतीमधून सावरला. टुर्नामेंटच्या फायनल मॅचच्यावेळी त्याला पुन्हा दुखापत झाली.
शाहीन शाह आफ्रिदीने टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये चांगलं प्रदर्शन केलं. शाहीनने टुर्नामेंटमध्ये 11 विकेट काढले. बांग्लादेश विरुद्ध 22 धावा देऊन 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
शाहीनच मैदानाबाहेर जाणं वर्ल्ड कप फायनलचा टर्निंग पॉइंट
शाहीन आफ्रिदीला आयसीसीच्या बेस्ट टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये सुद्धा स्थान मिळालय. त्याच्यासोबत शादाब खानलाही स्थान मिळालय. शाहीन शाह आफ्रिदी काल दुखापतीमुळे तिसरं षटक पूर्ण करु शकला नाही. पहिला चेंडू टाकल्यानंतर त्याने गोलंदाजी बंद केली. हाच वर्ल्ड कप फायनलचा टर्निंग पॉइंट ठरला. त्याच्यावाट्याचे पाच चेंडू इफ्तिखारने टाकले. त्यावर इंग्लंडने धावा वसूल केल्या. तिथूनच मॅच इंग्लंडच्या बाजूने फिरली.