लाहोर: पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज (Pakistan bowler) शाहीन शाह आफ्रिदीने (Shaheen Shah Afridi) जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याच्या त्याच्या कौशल्याला तोड नाही. लाहोरमध्ये ऑस्ट्रेलिया (Pakistna vs Australia Test) विरुद्ध सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्यादिवशी शाहीन शाह आफ्रिदीने पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली. चेंडू शाहीन शाह आफ्रिदीच्या हातात असताना, फलंदाज नेहमीच सर्तक असतो. कारण त्याची भेदक गोलंदाजी कधी यष्टया वाकवेल, याचा नेम नसतो. खेळपट्टी भले फलंदाजीला अनुकूल असली, तरी अशा विकेटवर शाहीन आफ्रिदीने विकेट घेऊन दाखवल्या आहेत. त्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा आज दबदबा आहे. आज ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याच्या भेदक माऱ्याची प्रचिती आली.
शाहीन आफ्रिदीचा अप्रतिम इनस्विंगर
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. आज या कसोटीचा पहिला दिवस होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरला आज शाहीन आफ्रिदीने आपल्या गोलंदाजीची दाहकता दाखवली. पहिल्या डावाच्या तिसऱ्याच षटकात शाहीन आफ्रिदीने अप्रतिम इनस्विंगर टाकला. वॉर्नरने बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पण आफ्रिदीने टाकलेल्या चेंडूचा वेगच इतका होता की, चेंडू थेट पॅडवर आदळला. आफ्रिदीने त्याला पायचीत केलं.
डेविड वॉर्नरला गुंडाळलं
डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा सर्वात धोकादायक फलंदाज आहे. आतापर्यंत त्याने अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. वॉर्नर खेळपट्टिवर टिकला, तर भल्याभल्या गोलंदाजांची खैर नसते. पण याच वॉर्नरला आफ्रिदीने आपल्या गोलंदाजीची भेदकता दाखवली. डेविड वॉर्नरने फक्त सात धावा केल्या.
SHAHEEN GETS WARNER! ☝? #BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/FcFAAFOFnS
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 21, 2022
त्याच षटकात शाहीनने आऊटस्विंगरवर मार्नल लाबुशेनला भोपळाही फोडू न देता पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजाने डाव सावरला. स्मिथ आणि ख्वाजाने तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. नसीम शाहने ही भागीदारी फोडली. स्मिथने 59 धावांची अर्धशतकी खेळी केली.