मुंबई: इंग्लंडमध्ये नुकतीच पार पडलेली कसोटी मालिका भारतीय संघासाठी एक सर्वस्वी वेगळा अनुभव ठरला. या कसोटी मालिकेतील प्रत्येक सामन्यातील चढउतार आणि त्यावेळी भारतीय संघातील कोणत्या ना कोणत्या खेळाडूने गेलेली जिगरबाज कामगिरी टीम इंडियाच्यादृष्टीने मोठे यश ठरले आहे. या सगळ्यात अत्यंत निर्णायक ठरलेल्या ओव्हल कसोटीत शार्दुल ठाकूरच्या रुपाने भारतीय संघाला आणखी एक भरवशाचा फलंदाज गवसला.
ओव्हल कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघ बिकट अवस्थेत सापडला असताना शार्दुल ठाकूरने अर्धशतक (57 धावा) झळकावत संघाला 200 धावांच्या आसपास नेऊन ठेवले. दुसऱ्या डावातही शार्दुलने 60 धावा झळकावत इंग्लंडसमोर मोठ्या धावसंख्येचे आव्हान ठेवण्यात संघाला मदत केली होती. या कसोटीत भारताचे आघाडीचे फलंदाज ढेपाळत असताना शार्दुलने केलेली जिगरबाज फलंदाजी सगळ्यांचीच वाहवा मिळवून गेली होती.
यासंदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शार्दुल ठाकूरने फलंदाजातील आपल्या यशाचे गमक सांगितले. दोन वर्षांपूर्वी मला दुखापत झाली होती तेव्हाच मी फलंदाजीत आणखी सुधारणा करण्याचे ठरवले होते. खालच्या क्रमांकावर खेळायला येऊनही मोठी खेळी उभारण्याची क्षमता माझ्यात आहे, हा आत्मविश्वास मला होता. त्यामुळे काहीही करून फलंदाजी आणखी सुधारायची, असा चंग मी बांधला होता. यापूर्वीही मला फलंदाजी करताना मोठी खेळी उभारण्याची संधी अनेकदा मिळाली होती. मात्र, त्यावेळी मी संधीचा पुरेसा लाभ उठवू शकलो नाही. मात्र, भविष्यात असे होऊ द्यायचे नाही, असा निर्धारच मी केल्याचे शार्दुलने सांगितले.
भारतीय संघात पुनरागमन झाल्यानंतर मी थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघु आणि नुवान यांच्यासोबत फलंदाजीचा सराव केला. हे दोघेही खूपच वेगवान गोलंदाजी करत असल्याने सुरुवातीला मला त्यांच्यासमोर खेळायला जमत नव्हते. यानंतर मी फुटवर्क सुधारण्यावर भर दिला आणि हळूहळू माझ्या फलंदाजीत सुधारणा होऊ लागली. ओव्हल कसोटीत मी केलेल्या धावा हा केवळ योगायोग नसून त्यासाठी मी केलेली शिस्तबद्ध मेहनत कारणीभूत असल्याचे शार्दुलने सांगितले.
रघु आणि नुवान यांनी तुला कोणता सल्ला दिला होता का, असा प्रश्न या मुलाखतीत शार्दुलला विचारण्यात आला. त्यावेळी शार्दुलने म्हटले की, नाही, पण या दोघांनी माझ्यासाठी गोलंदाजीत थोडा बदल केला होता. हे दोघेही एरवी अत्यंत वेगवान गोलंदाजी करतात. पण मी प्रॅक्टिससाठी मैदानात उतरत असे तेव्हा सुरुवातीला दोघेही कमी वेगाने गोलंदाजी करायचे आणि नंतर वेग वाढवत न्यायचे, असे शार्दुलने सांगितले.
फलंदाजी सुधारण्यासाठी मला रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही मदत केली. हे दोघेही मला सतत प्रोत्साहन देत होते. मी फलंदाजासाठी मैदानात उतरल्यावर एखाद्या फलंदाजासारखाच विचार केला पाहिजे. एकदा मी ड्रेसिंग रूममध्ये माही भाईसोबत होतो. (महेंद्रसिंग धोनी) तेव्हा मी त्यांची बॅट हातात पकडली होती. तेव्हा धोनीने तुझी ग्रीप उंच असल्याचे सांगितले. तेव्हापासून मी बॅटची ग्रीप खाली पकडायला लागलो. त्यामुळे फलंदाजी करताना फटक्यांवर नियंत्रण ठेवण्यास मला मदत झाल्याचे शार्दुलने सांगितले.