मुंबई : पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan ) पुन्हा एकदा प्रेमात पडलाय. धवनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2021 मध्ये पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर धवन पुन्हा प्रेमात पडल्याची कबुली देत आहे. धवन लवकरच पुन्हा विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. धवन पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये असून तो लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
शिखर धवन आपल्या या नव्या रिलेशनशिपमध्ये आनंदी असल्याचं म्हटलं जात आहे. पहिल्या पत्नीपासून वेगळा झाल्यानंतर त्याला आता आयुष्यात पुढे जायचं आहे. असं तो म्हणत आहे. त्यामुळे टीम इंडियाचा गब्बर कोणाच्या प्रेमात पडलाय याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण याबाबत शिखर धवनकडून अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
2020 मध्ये शिखर धवनने पहिली पत्नी आयशापासून वेगळे होत असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या घटस्फोटाचे प्रकरण अजूनही सुरू आहे. एका मुलाखतीदरम्यान आयशा मुखर्जीकडून घटस्फोटावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर धवन म्हणाला की, घटस्फोटाचा मुद्दा अजूनही कोर्टात आहे. आमचे जमले नाही, त्यात आम्ही अपयशी ठरलो. त्याने पुन्हा लग्न केले तर नाते बिघडवणाऱ्या चुका न करण्याचा प्रयत्न करेल. असं ही तो म्हणाला.
पंजाब किंगचा कर्णधार शिखर धवन यावेळी आयपीएलमध्ये वर्चस्व गाजवत आहे. संघ केवळ चमकदार कामगिरी करत नाही, तर त्यांची बॅटही सतत धावा काढत आहे. धवनने आतापर्यंत तीन सामन्यांत 225 च्या सरासरीने 225 धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट 149 च्या आसपासचा आहे. यादरम्यान धवनने दोन शतके झळकावली आणि ऑरेंज कॅपही त्याच्याकडे आहे.
धवनच्या नेतृत्वाखाली पंजाब संघाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत तीन सामन्यांपैकी पंजाबने दोन सामने जिंकले असून एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन सामने जिंकूनही पंजाब गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. पंजाबशिवाय राजस्थान, चेन्नई, लखनौ आणि कोलकाता या संघांनीही प्रत्येकी दोन सामने जिंकले असून त्यांचेही ४ गुण आहेत. रनरेटमुळे सर्व संघ पॉइंट टेबलमध्ये पंजाबपेक्षा पुढे आहेत.