नवी दिल्ली: भारताविरुद्ध होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या सीरीजसाठी वेस्ट इंडिजने संघाची (West Indies Criket Team) घोषणा केली आहे. कायरन पोलार्ड (Kieron Pollard) या संघाचे नेतृत्व करणार आहे. पोलार्डच्या नेतृत्वाखाली भारत दौऱ्यावर येणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघात आक्रमक फलंदाज शिमरोन हेटमायरला (Shimron Hetmyer) स्थान मिळू शकलेले नाही. शिमरोन हेटमायरला संघात स्थान न मिळण्यामागे कारण आहे, त्याचा फिटनेस. या महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजचे मुख्य कोच फिल सिमन्स यांनी फिटनेसबद्दल हेटमायरच्या दृष्टीकोनावर नाराजी व्यक्त केली होती. हेटमायर वेस्ट इंडिजच्या नव्या पीढीच्या प्रतिभावंत फलंदाजांपैकी एक आहे. अंडर 19 मधून पुढे आलेला हेटमायरमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. पण स्वत:च्या फिटनेसबद्दल हा खेळाडू तितका सजग नाहीय, त्यामुळे भारताविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
कोच म्हणतात, ते पाहून दु:ख होतं.
25 वर्षाचा हा युवा फलंदाज इंग्लंड विरुद्धच्या सीरीजआधी फिटनेसमध्ये फेल झाला होता. त्यानंतरही तो फिटनेस टेस्ट पास करु शकलेला नाही. “स्वत:ला आणि संघातील सहकाऱ्यांना हेटमायरकडून निराशा मिळते, ते पाहून दु:ख होतं” असं फिल सिमन्स म्हणाले होते. “टीमने इंग्लंड विरुद्धच्या टी-20 सीरीजमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आम्ही हाच संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी खूप चांगला खेळ केला. भारतातही या संघाकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे” असे मुख्य निवडकर्ते डेसमंड हेन्स म्हणाले. वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धची टी ट्वेंन्टी सीरीज ३-२ अशी जिंकली.
16 फेब्रुवारीपासून टी 20 सीरीज
वेस्ट इंडिजचा संघ 16 फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 16,18 आणि 20 फेब्रुवारीला कोलकात्याच्या मैदानावर हे सामने होतील. याआधी सहा, नऊ आणि 11 फेब्रुवारीला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल.
shimron hetmyer out as west indies name squad for t20 is against india