Team India | टीम इंडियाची डोकेदुखी मिटली, हार्दिक पंड्यापेक्षा जबरा ऑलराउंडर मिळाला!

| Updated on: Jan 15, 2024 | 3:52 PM

India vs Afghanistan | टीम इंडियाला आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 आधी दिलासादायक बातमी मिळाली आहे. टीम इंडियाला हार्दिक पंड्यापेक्षा भारी ऑलराउंडर मिळाला आहे, कोण आहे तो?

Team India | टीम इंडियाची डोकेदुखी मिटली, हार्दिक पंड्यापेक्षा जबरा ऑलराउंडर मिळाला!
Follow us on

इंदूर | टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन हार्दिक पंड्या याला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 दरम्यान दुखापत झाली. तेव्हापासून हार्दिक टीममधून बाहेर आहे. त्यामुळे हार्दिकला ऑस्ट्रलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 मालिकेला मुकावं लागलं आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या तोंडावर हार्दिक लवकरात लवकरात बरा होऊन तो परतावा अशी इच्छा क्रिकेट चाहत्यांची आहे. मात्र दुसऱ्या बाजूला हार्दिक आता टीममध्ये परतला नाही तरी चालेल, असं क्रिकेट चाहत्याचं मत आहे.

हार्दिकला दुखापत झाल्याने टीम इंडियात त्याच्या तोडीस तोड खेळाडू कोण, असा सवाल उपस्थित झाला होता. कारण हार्दिक कॅप्टन्सीसह बॅटिंग आणि बॉलिंग करतो. त्यामुळे हार्दिकच्या अनुपस्थितीत त्याच्यासारखा खेळाडू मिळणं अवघडच. पण अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 मालिकेतून हार्दिकपेक्षा तोडीसतोड ऑलराउंडर टीम इंडियाला मिळाला आहे.

टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने सलग 2 सामने जिंकत मालिका जिंकली. टीम इंडियाला 2 सामने जिंकून देण्यात मुंबईकर ऑलराउंडरने मोठी भूमिका बजावली. या ऑलराउंडरने बॅटिंग आणि बॉलिंगने चोख भूमिका पार पाडली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना हार्दिकची अनुपस्थितीच भासली नाही. त्यामुळे टीम इंडियाला हार्दिकपेक्षा तोडीसतोड ऑलराउंडर मिळाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो मुंबईकर ऑलराउंडर कोण आहे, हे आपण जाणून घेऊयात.

आपण बोलतोय ते ऑलराउंडर शिवम दुबे याच्याबाबत. शिवमने अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या 2 टी 20 सामन्यांमध्ये 2 विकेट घेत एकूण 123 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे शिवम सलग दोन्ही सामन्यात नाबाद परतला आहे. शिवमने दोन्ही सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी केली. शिवमने पहिल्या सामन्यात 1 विकेटसह नाबाद 60 धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद 63 धावांसह 1 विकेट घेण्याची कामगिरी केली.

आगामी टी 20 वर्ल्ड कपला 1 जून 2024 पासून सुरुवात होतेय. मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक कमबॅकसाठी जोर लावतोय. तसेच टीम इंडियाची अफगाणिस्तान विरुद्धची टी 20 मालिका ही वर्ल्ड कपआधीची अखेरची आहे. शिवमने आपली अष्टपैलू कामिगरी करत संधीचं सोनं केलं आहे. आता शिवमला वर्ल्ड कपसाठी संधी मिळेल की नाही, हे नंतर ठरेल. पण शिवमने त्याच्या खेळीने हार्दिकची डोकेदुखी वाढवली, इतकं मात्र निश्चित.