मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) स्टार खेळाडू विराट कोहलीचा (Virat kohli) खराब फॉर्म कायम आहे. आजही विराट शुन्यावर बाद झाला. विराटच्या या फॉर्मवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भाष्य केलं आहे. “विराटला काहीही सिद्ध करुन दाखवण्याची गरज नाही. सध्या त्याच्यावर दबाव असल्यामुळे तो मोठी धावसंख्या उभारु शकत नाहीय” असं अख्तरने म्हटलं आहे. “विराट कोहली एक मोठा खेळाडू आहे. त्याला काहीही सिद्ध करुन दाखवण्याची गरज नाही. स्वत:ला सिद्ध करुन दाखवण्याचा त्याच्यावर दबाव आहे. त्यामुळे त्याच्याकडून धावा होत नाहीयत. आयपीएलमध्ये त्याने आधीच स्वत:ला सिद्ध केलं आहे” असं शोएब स्पोटर्सकीडाशी बोलताना म्हणाला.
“शोएब अख्तरच्या मते, विराटने फक्त मैदानावर जाऊन खेळाचा आनंद घेण्याची गरज आहे. धावा बनवण्यासाठी तो खूप प्रयत्न करतोय. मी विराट कोहली आहे, आणि मी जे नेहमी करतो, ते आज करु शकत नाहीय, असा विचार तो करतोय. हीच वेळ असते, जेव्हा तुम्ही मनुष्य आहात, हे लक्षात घेतलं पाहिजे” असं शोएब म्हणाला. “माणसं अपयशी ठरतात. पण विराट सारखे लोक जे महान खेळाडू आहेत. त्यांना माहित असतं, की अपयशानंतर कमबॅक कसं करायचं. सध्या सगळेच जण त्याच्या मागे लागलेत” असं शोएब अख्तरने सांगितंल.
आज सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला. खरंतर विराट जगदीशा सुचिताच्या ज्या चेंडूवर आऊट झाला तो बाद होण्यासारखाच नव्हता. पण विराट बाद झाला. त्याने विलियमसनकडे सोपा झेल दिला. विराट कोहलीने आयपीएलच्या या सीजनमध्ये 12 सामन्यात 216 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 20 ही नाहीय. स्ट्राइक रेट 112 पेक्षा कमी आहे. विराटने 12 डावात फक्त एक अर्धशतक झळकावलं आहे. मागच्या दोन वर्षात विराट कोहलीच्या बॅटमधून शतकही निघालेलं नाही. सगळा मीडिया त्याच्या मागे लागला आहे.