मुंबई: क्रिकेट मधून निवृत्त झाला असला, तरी पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असतो. रविवारी शोएबने त्याचा एक इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केलाय. शोएब या व्हिडिओ मध्ये हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसतो. शोएब गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी ऑस्ट्रेलियात (Australia) मेलबर्न येथे गेला आहे. त्याने तिथून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकृतीबद्दल माहिती दिली. लवकरात लवकर आपल्याला बरं वाटावं, यातून बाहेर पडता यावं, यासाठी शोएबने चाहत्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.
मागच्या 11 वर्षांपासून शोएब अख्तर गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. मी अजून चार ते पाच वर्ष खेळू शकलो असतो, पण त्यानंतर मला व्हीलचेयरवर बसून आयुष्य काढावं लागलं असतं, असं 46 वर्षीय शोएब या व्हिडिओत म्हणताना दिसतो. “मी अजून चार ते पाच वर्ष खेळू शकलो असतो. पण मला कल्पना होती, मी अजून खेळलो, तर मला व्हीलचेयरवर बसून आयुष्य काढावं लागेल. त्यासाठीच मी क्रिकेट मधून निवृत्ती स्वीकारली” असं शोएब म्हणाला.
शोएब अख्तरवर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. तिथे त्याच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली. याआधी सुद्धा त्याच्यावर अशाच पाच शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ही शेवटची शस्त्रक्रिया ठरावी, अशी त्याची अपेक्षा आहे. “सध्या मला वेदना होत आहेत. तुमच्या प्रार्थनांची आवश्यकता आहे. ही माझ्यावर शेवटची शस्त्रक्रिया असावी, अशी मी अपेक्षा करतो”, असं शोएब या व्हिडिओ मध्ये म्हणाला. देशाच पाकिस्तानच प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्याने समाधान व्यक्त केलं.