मुंबई: आयपीएल 2022 च्या (IPL) मोसमाची दमदार सुरुवात करणाऱ्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला एकाच दिवसात दोन झटके बसले आहेत. मंगळवारी राजस्थान रॉयल्सचा RCB ने पराभव केला. राजस्थान रॉयल्सचा हा पहिला पराभव आहे. आता राजस्थान रॉयल्सचा एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. राजस्थानच्या संघातून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा मध्यमगती गोलंदाज नाथन क्लूटर-नाइल दुखापतग्रस्त (Nathan coulter-Nile injured) झाला आहे. त्यामुळे तो संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. क्लूटर मायदेशात परतणार आहे. राजस्थानने सध्या नाथन क्लूटर-नाइलच्या जागी दुसऱ्या गोलंदाजाच्या नावाची घोषणा केलेली नाही. राजस्थान रॉयल्सने बुधवारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. कूल्टर नाइल दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडतोय, अशी माहिती संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला लवकरात लवकर बरं होण्याची आणि पुढच्या सीजनमध्ये संघाकडून खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कूल्टर नाइलला कधी आणि कुठल्या स्वरुपाची दुखापत झालीय, त्याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
मागच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग असलेल्या कूल्टर नाइलला राजस्थान रॉयल्सने या सीजनमध्ये दोन कोटी रुपयांच्या बेस प्राइसमध्ये विकत घेतलं होतं. लिलावाच्या पहिल्या फेरीत त्याची विक्री झाली नव्हती. दुसऱ्यादिवशी राजस्थानने त्याचा आपल्या ताफ्यात समावेश करुन घेतला. कूल्टर नाइल यंदाच्या सीजनमध्य राजस्थानकडून पहिला सामना सुद्धा खेळला होता. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात तो महागडा गोलंदाज ठरला होता. तीन षटकात त्याने 48 धावा दिल्या होत्या.
Until we meet again, NCN. ?
Speedy recovery. ?#RoyalsFamily | #HallaBol | @coulta13 pic.twitter.com/XlcFUcTg5L
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 6, 2022
राजस्थान रॉयल्स लवकर कूल्टर नाइलच्या जागी दुसऱ्या खेळाडूच्या नावाची घोषणा करु शकते. दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेलेला कूल्टर नाइल यंदाच्या सीजनमधला दुसरा खेळाडू आहे. याआधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा युवा खेळाडू लवनीत सिसोदिया सुद्धा काही दिवसांपूर्वी दुखापतग्रस्त झाला होता. बँगलोरने त्याच्याजागी रजत पाटीदारचा संघात समावेश केला होता.