मुंबई: टीम इंडियाने वेस्ट इंडिजला वनडे सीरीज (ODI Series) मध्ये हरवलं आहे. भारताने रविवारी दुसऱ्यावनडेत 2 विकेटने विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध अक्षर पटेल, (Axar Patel) संजू सॅमसनने (Sanju Samson) अर्धशतक फटकावलं. त्याशिवाय श्रेयस अय्यरने सुद्धा हाफ सेंच्युरी झळकवली. पण तरीही श्रेयस अय्यर निराश आहे. “मी चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पण अर्धशतक शतकामध्ये बदलता येत नसल्याने निराश आहे” असं श्रेयसने सामन्यानंतर सांगितलं.
अय्यरने दुसऱ्या वनडेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 71चेंडूत 63 धावा केल्या. अय्यरने संजू सॅमसनसोबत चौथ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. सॅमसनने 54 धावा केल्या. अक्षर पटेलने नाबाद 64 धावा फटकावून भारताला विजय मिळवून दिला. अंतिम 3 चेंडूत भारताला विजयासाठी 5 धावांची गरज होती. अक्षर पटेलने चौथ्या चेंडूवर षटकार मारुन टीम इंडियाला मालिकेत विजयी आघाडी मिळवून दिली. दरम्यान अय्यर ज्या पद्धतीने आऊट झाला, त्यावर तो निराश आहे.
“मी ज्या धावा केल्या, त्याने आनंदी आहे. पण मी ज्या पद्धतीने आऊट झालो, त्यावर नाखुश आहे. मला संघाला सहजपणे विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे होतं. मी चांगली सुरुवात केली. पण दुर्भाग्यपूर्ण पद्धतीने विकेट गमावला. पुढच्या सामन्यात यापेक्षा चांगली कामगिरी करेन आणि शतक बनवीन अशी अपेक्षा आहे” असं श्रेयस अय्यर म्हणाला.
श्रेयस अय्यरच्या मनात शतक न बनवण्याची खंत आहे. मी सहजपणे माझा विकेट गमावला नाही. चांगल्या सुरुवातीला शतकामध्ये बदलायला पाहिजे होतं, असं श्रेयसच मत आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात अशा प्रकारची सुरुवात नेहमी मिळत नाही, असं अय्यरने सांगितलं. म्हणून अर्धशतकाला शतकामध्ये बदलणं महत्त्वाचं आहे. माझ्याकडे चांगली संधी होती. पण चुकलो, असं श्रेयस म्हणाला.