नवी दिल्ली – इतिहासाची पुनरावृत्ती होते, असं म्हणतात. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये 23 जानेवारीला T20 सामना झाला. त्यात हेच दिसून आलं. भारतीय फलंदाज स्मृती मांधना आणि हरमनप्रीत यांनी 4 वर्षापूर्वीची स्टोरी रिपीट केली. दोघींनी वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडियाच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली. T20 तिरंगी मालिकेतील भारताचा हा दुसरा सामना होता. टीम इंडियाने 56 रन्सनी ही मॅच जिंकली. टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे. याआधी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं.
आधी सरस बॅटिंग केली
टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध ऑलराऊंडर विजय मिळवला. भारताने आधी सरस बॅटिंग केलीच. पण गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्येही कमालीच प्रदर्शन केलं. तिन्ही विभागात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला बॅकफूटवर ढकललं. त्यामुळे भारतीय टीमने विजय मिळवला.
शेवटच्या 10 ओव्हरमध्ये दोघींनी धुतलं
टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावून 167 धावा केल्या. भारताने आधी 10 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 60 धावा केल्या. त्यानंतर पुढच्या 10 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 107 धावा चोपल्या. भारताची सुरुवात धीमी होती. पण अखेरीस वेग पकडला. स्मृती मांधना आणि हरमनप्रीत कौरने फटकेबाजी करुन भारतीय इनिंगला गती दिली.
4 वर्षापूर्वीची स्टोरी रिपीट
स्मृती आणि हरमनप्रीत दरम्यान तिसऱ्या विकेटसाटी 115 धावांची पार्ट्नरशिप झाली. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या विकेटसाठी भारतीय महिला टीमची ही दुसरी शतकी भागीदारी आहे. महत्त्वाच म्हणजे दोघींनी वेस्ट इंडिज विरुद्ध ही भागीदारी केली. याआधी 2019 साली t20 सामन्यात भारतीय महिलांनी वेस्ट इंडिज विरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली होती. वेदा कृष्णमुर्ती आणि जेमिमा रॉड्रीगेज दरम्यान ही भागीदारी झाली होती.
स्मृती आणि हरमनप्रीतने ठोकली अर्धशतकं
भारताकडून स्मृती मांधनाने 51 चेंडूत नाबाद 74 धावा फटकावल्या. यात 10 चौकार आणि एक षटकार होता. हरमनप्रीत कौरने 160 च्या स्ट्राइक रेटने फक्त 35 चेंडूत 56 धावा केल्या. तिने 8 चौकार मारले. स्मृती मांधनाला या इनिंगसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.
टीम इंडियाने वेस्ट इंडिजला असं हरवलं
वेस्ट इंडिजसमोर भारताने विजयासाठी 168 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. वेस्ट इंडिजच्या टीमने 4 विकेट गमावून फक्त 111 धावा केल्या. कँपबेल आणि हॅले मॅथ्यूज दरम्यान अर्धशतकी भागीदारी झाली. भारताकडून दिप्ती शर्मा यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 2 विकेट घेतल्या.