Sourav Ganguly New House: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलीचा पत्ता लवकरच बदलणार आहे. Sourav Ganguly ने कोलकात्याच एक नवीन आलिशान घर विकत घेतलं आहे. सौरव गांगुली लवकरच आपल्या या नव्या घरात रहायला जाणार आहे. सौरव गांगुलीने या नव्या घरासाठी थोडी थोडकी नव्हे, घसघशीत रक्कम मोजली आहे. सौरव गांगुलीने नव्या घरासाठी मोजलेली किंमत वाचून डोळे विस्फारतील. सौरव गांगुली पश्चिम बंगालमधील (West bengal) एक मोठं नाव आहे. भले, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असेल, पण आजही बंगालमध्ये गांगुलीचा एक रुतबा आहे. त्याच्याबद्दल प्रचंड आदराची भावना आहे. पश्चिम बंगाल आणि भारतीय क्रिकेटमध्ये सौरव गांगुलीला ‘दादा’ म्हणतात. हे नवीन घर बिलकुल त्याच्या लौकीकाला साजेसं आहे. सौरव गांगुलीला नव्या घरात गृहप्रवेश करताना तब्बल 48 वर्ष जूनं घर सोडावं लागणार आहे.
लोअर रॉडॉन स्ट्रीट हा सौरव गांगुलीचा नवीन पत्ता असणार आहे. तिथे त्याने एक प्लॉट विकत घेतला आहे. सध्या या प्लॉटवर दोन मजली इमारत आहे. सौरव गांगुलीने विकत घेतलेली नवीन प्रॉपर्टी सेंट्रल कोलकातामध्येच आहे. रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते बंगला बांधण्यासाठी ही एकदम योग्य प्रॉपर्टी आहे. सध्या गांगुलीचा बंगला बिहाला येथील बिरेन रॉय रोडवर आहे. हे गांगुलीच्या पूर्वजांचं घर असून तिथे तो कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत राहतो.
सौरव गांगुलीची गणना भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये होते. सौरव गांगुली स्वत: स्वाभावाने आक्रमक आहे. त्याने तोच लढाऊ बाणा भारतीय संघात भिनवला. आज भारतीय संघात जी आक्रमकता दिसते, जिंकण्याचा आवेश दिसतो, त्याचं श्रेय गांगुलीला जातं.
गुरुवारी संध्याकाळी सौरव गांगुलीने पत्रकाराशी बोलताना विकत घेतलेल्या नव्या घराबद्दल समाधान, आनंद व्यक्त केला. “माझं स्वत:च घर झाल्याचा आनंद आहे. मध्यभागात राहणं, सोयीस्कर ठरेल. 48 वर्ष मी जिथे राहिलो, ती जागा सोडणं, खूप कठीण आहे” असं गांगुलीने सांगितलं. द टेलिग्राफने हे वृत्त दिलं आहे. सौरव गांगुलीने हे नवीन घर विकत घेण्यासाठी तब्बल 40 कोटी रुपये मोजले आहेत.