लंडन : द ओव्हलवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. WTC फायनलच्या पहिल्या दोन दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियन टीमने पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या ओव्हरमध्ये स्टीव्ह स्मिथने सेंच्युरी झळकवली. ट्रेविस हेडने 163 धावा केल्या. लंचनंतर एका तासात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 469 धावांवर ऑलआऊट केलं. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर रोहित शर्मा, (15) शुभमन गिल, (13) विराट कोहली, (14) चेतेश्वर पुजारा (14) स्वस्तात बाद झाले.
रवींद्र जाडेजा आणि अजिंक्य रहाणेमध्ये 73 धावांची भागीदारी झाल्यामुळे टीम इंडियाने दिवसअखेर 150 धावांचा टप्पा ओलांडला. 5 बाद 151 अशी टीम इंडियाची स्थिती आहे. ऑस्ट्रेलिया ड्रायव्हींग सीटवर आहे.
मिचेल स्टार्कचा अप्रतिम चेंडू
मिचेल स्टार्कच्या एका अप्रतिम चेंडूवर विराट कोहली 14 रन्सवर आऊट झाला. 4 बाद 71 अशी स्थिती होती. त्यानंतर जाडेजा आणि रहाणेच्या 73 धावांच्या भागीदारीने टीम इंडियाचा डाव सावरला. टीम इंडियाचा डाव कुठे स्थिरावतोय असं वाटत असतानाच., नॅथन लायनने रवींद्र जाडेजाला बाद करुन झटका दिला.
गांगुलीचा टोमणा
लायनने रवींद्र जाडेजाला आऊट केलं. त्यावरुन सौरव गांगुलीने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांना जोरदार टोमणा मारला. आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये नंबर 1 असूनही रविचंद्रन अश्विनला प्लेइंग 11 मधून वगळलं. त्यावरुन गांगुलीने रोहित-द्रविड जोडीवर निशाणा साधला.
नाव न घेता काय म्हणाला?
“हिरव्या गार खेळपट्टीवर ऑफ स्पिनर खेळू शकत नाही, असं कोण म्हणतं?. लायनच्या नावावर कसोटीमध्ये 400 पेक्षा जास्त विकेट आहेत. आताच्या क्षणाला त्याने टीम इंडियाचा बेस्ट बॅस्टमन रवींद्र जाडेजाला आऊट केलय. विकेटवर टर्न आणि बाऊन्स दोन्ही आहे” असं गांगुली म्हणाला. त्याने नाव न घेता रोहित-द्रविड जोडीला टोमणा मारला.
रोहित शर्मावर गांगुलीची टीका
अश्विनबद्दलच्या निर्णयावर सौरव गांगुलीने नापसंती व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाहीय. सौरव प्रमाणेच अनेक क्रिकेट पंडितांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलय. सौरव गांगुलीने याआधी सुद्धा रोहित शर्मावर टीका केलीय. रोहित शर्माने कसोटीच्या पहिल्या दिवशी जी, फील्ड प्लेसमेंट केली होती, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. सौरवच्या मते रोहितने चुकीची फिल्ड प्लेस केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला आरामात धावा मिळाल्या.