मुंबई: आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्याची म्हण तुम्ही ऐकली असेल. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने (South Africa Cricket Borad) सुद्धा असाच एक निर्णय घेतलाय. हा निर्णय दक्षिण आफ्रिकेसाठी आत्मघातकी ठरु शकतो. आत्मघातकी यासाठी, कारण यामुळे पुढच्यावर्षी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपला (World cup) दक्षिण आफ्रिकेचा संघ मुकू शकतो. वर्ल्ड कप साठी पात्र ठरण्याचा दक्षिण आफ्रिकेचा मार्ग अजून बिकट बनलाय. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया (SA vs AUS) विरुद्ध खेळली जाणारी, तीन वनडे सामन्यांची मालिका रद्द केली आहे. तुम्ही म्हणाल, एक सीरीज रद्द केली, म्हणून वर्ल्ड कप मध्ये का खेळता येणार नाही? त्याचं असं आहे की, त्यांना जे पॉइंटस आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 सुपर लीग सीरीज अंतर्गत मिळणार होते, ते आता मिळणार नाहीत. आता ते सगळे पॉइंटस ऑस्ट्रेलियाला मिळतील. म्हणजे दक्षिण आफ्रिकेसाठी वर्ल्ड कप मधील प्रवेशाचा मार्ग खडतर बनू शकतो.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या ICC वनडे वर्ल्ड कप 2023 सुपर लीग पॉइंटस टॅली मध्ये 11 व्या स्थानावर आहे. आता सीरीज रद्द केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला 30 पॉइंटस मिळतील. पण दक्षिण आफ्रिकेच्या पॉइंटस मध्ये घट होऊन ते अजून खाली घसरतील. दक्षिण आफ्रिकेच्या आता जास्त वनडे सीरीजही उरलेल्या नाहीत. दक्षिण आफ्रिकेने स्वत:च पुढच्यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपआधी स्वत:चा मार्ग अजून बिकट करुन घेतलाय.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात जानेवरी मध्ये वनडे सीरीज होणार होती. नव्या टी 20 लीग मध्ये खेळण्यासाठी खेळाडू उपलब्ध रहावेत, यासाठी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने सीरीज रद्द करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. पण कसोटी मालिका खेळून माघारी परतेल. त्यानंतर वनडे सीरीज खेळणार नाही. याचे पॉइंटस ऑस्ट्रेलियाला मिळतील. आयसीसीकडून यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही.
पुढच्यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप साठी दक्षिण आफ्रिकेचं थेट क्वालिफिकेशन आता कठीण वाटतय. क्वालिफाय करण्यासाठी त्यांना पात्रता सामने खेळावे लागतील. वनडे सीरीज रिशेड्यूल केली, तर खेळण्यासाठी तयार आहोत, असं दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे.