KL Rahul: ‘राहुलकडे आयडीयाज नाहीत असं वाटलं’, कॅप्टन म्हणून गावस्करांनी दाखवून दिली मोठी चूक

| Updated on: Jan 20, 2022 | 5:27 PM

"ज्यावेळी चांगली भागिदारी होत असते, तेव्हा काहीवेळेला कर्णधाराला काही सुचत नाही. मला वाटतं मैदानावर राहुल बरोबर तसं घडलं. फलंदाजीसाठी ही चांगली विकेट होती. चेंडू बॅटवर आरामात येत होता" असे गावस्कर म्हणाले.

KL Rahul: राहुलकडे आयडीयाज नाहीत असं वाटलं, कॅप्टन म्हणून गावस्करांनी दाखवून दिली मोठी चूक
सुनिल गावस्कर
Follow us on

मुंबई: भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी पुन्हा एकदा केएल राहुलच्या नेतृत्वावर टीका केली आहे. टेंबा बावुमा (Temba Bavuma) आणि रॅसी डुसे जेव्हा मॅचविनिंग भागीदारी करत होते, तेव्हा कॅप्टन केएल राहुलकडे (KL Rahul) त्यांना रोखण्यासाठी कुठल्या नवीन कल्पना दिसल्या नाहीत, असं गावस्कर यांनी म्हटलय. केएल राहुलसाठी सुरुवातीचे दिवस आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघ सरस खेळ दाखवेल, अशी अपेक्षा गावस्कर यांनी व्यक्त केली.

गोलंदाजीतील बदलावर प्रश्नचिन्ह

भारतीय संघाने गोलंदाजीत जे बदल केले, त्यावर सुनील गावस्करांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारकडून डाव्याच्या अखेरीस जास्त गोलंदाजी करुन घ्यायला पाहिजे होती. मधल्या षटकांमध्ये बावुमा-डुसेची भागीदारी तोडण्यासाठी वेंकटेश अय्यरला गोलंदाजीची संधी दिली पाहिजे होती” असे गावस्कर म्हणाले.
“ज्यावेळी चांगली भागिदारी होत असते, तेव्हा काहीवेळेला कर्णधाराला काही सुचत नाही. मला वाटतं मैदानावर राहुल बरोबर तसं घडलं. फलंदाजीसाठी ही चांगली विकेट होती. चेंडू बॅटवर आरामात येत होता” असे गावस्कर म्हणाले.

मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखता आले असते

“बावुमा-डुसेची भागीदारी होत असताना, राहुलकडे आयडीयाज नाहीत असं वाटलं. कुठे जायचं हे राहुलला कळत नव्हतं. तुमच्याकडे शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी बुमराह आणि भुवनेश्वर सारखे अनुभवी गोलंदाज आहेत. शेवटच्या पाच-सहा षटकांसाठी त्यांना राखून ठेवायला पाहिजे होते. त्यामुळे तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखता आले असते” असे गावस्कर म्हणाले. “राहुलच्या कॅप्टनशिपचे हे सुरुवातीचे दिवस आहेत. भारतीय क्रिकेटसाठी पुढच्या काही दिवसात गोष्टी बदलतील अशी अपेक्षा करुया” असे गावस्कर म्हणाले.

काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे मध्ये भारताचा 31 धावांनी पराभव झाला. बावुमा आणि डुसेच्या शतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 297 धावांचे लक्ष्य ठेवले पण भारताने निर्धारीत 50 षटकात 265 धावा केल्या. नियमित कर्णधार रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमधून अजून सावरलेला नाही. त्यामुळे राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. जोहान्सबर्ग कसोटीतही राहुलने नेतृत्व केलं होतं, तेव्हा सुद्धा भारताचा पराभव झाला होता.

South Africa vs India Captain KL Rahul looked like he had run out of ideas in 1st ODI says Sunil Gavaskar