जोहान्सबर्ग : भारतात यावर्षी वनडे वर्ल्ड कपच आयोजन होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप टुर्नामेंटसाठी टीम्स आतापासून स्वत:ला तयार करतायत. पण या दरम्यान काही खेळाडूंचा फिटनेस हा टीम्ससाठी चिंतेचा विषय आहे. टीम इंडियाचे दोन स्टार क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह आणि विकेटकीपर ऋषभ पंत या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार की, नाही? या बद्दल अजून स्पष्टता नाहीय. टीम इंडियाच नाही, दक्षिण आफ्रिकेच्या टीमसमोरही असच संकट उभ ठाकलय. त्यामागे कारण आहे, विकेटच सेलिब्रेशन.
जोहान्सबर्गमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचचा चौथा दिवस दक्षिण आफ्रिकेसाठी संमिश्र ठरला. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने टेस्टसह पहिली सीरीज जिंकली. दुसऱ्याबाजूला विजयाचा आनंद असताना, प्रमुख गोलंदाज केशव महाराजच्या दुखापतीने चिंता वाढवलीय. मॅच दरम्यान फिल्डिंग करताना दुखापत झाली, तर आपण समजू शकतो. पण इथे वेस्ट इंडिजचा विकेट गेल्यानंतर सेलिब्रेशन करताना केशव महाराजला दुखापत झाली.
आधी OUT दिलं नव्हतं
दुसऱ्याडावात वेस्ट इंडिजची टीम दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत होती. 19 व्या ओव्हरमध्ये केशव महाराज गोलंदाजी करत होता. त्याने त्या ओव्हरमध्ये काइल मेयर्सचा विकेट घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने अपील केल्यानंतर अंपायपने मेयर्सला LBW आऊट दिलं नाही. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या टीमने DRS घेतला. निर्णय त्यांच्या बाजूने आला.
काय घडलं?
थर्ड अंपायरने बाद असल्याचा कौल देताच दक्षिण आफ्रिकेची टीम सेलिब्रेशनमध्ये बुडून गेली. केशव महाराजला सुद्धा विकेट मिळाल्याने आनंद झाला. आनंदाच्या भराने त्याने उडी मारली. त्याचवेळी त्याच्या पायात वेदना जाणवल्या. महाराज मैदानातच झोपला.
Wishing you everything of the best in your recovery Kesh ?
We know you’ll be back stronger than ever ? pic.twitter.com/DRYxc7OxJP
— Proteas Men (@ProteasMenCSA) March 11, 2023
आता शस्त्रक्रिया करावी लागणार
केशव महाराजला काय झालं? म्हणून टीमचे खेळाडू त्याच्याभोवती जमा झाले. त्यांनी विचारपूस सुरु केली. टीमचे फिजियो लगेच धावत मैदानात आले. महाराजला होणाऱ्या वेदना आणि दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला स्ट्रेचर वरुन मैदानाबाहेर न्यावं लागलं. रुग्णालयात स्कॅन केल्यानंतर त्याच्या डाव्या टाचेला गंभीर दुखापत झाल्याच स्पष्ट झालं.
यासाठी केशव महाराजवर आता शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. केशव महाराजला पूर्णपणे फिट होऊन मैदानात परतण्यासाठी 6 महिने लागू शकतात. त्याच्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची शक्यता कमी दिसतेय.