IND vs AUS Test : भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा कसोटी सामना कव्हर करायला गेलेल्या पत्रकाराचा मृत्यू झाला. इंदोरच्या हॉटेलमध्ये या पत्रकाराने अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ह्दयविकाराच्या झटक्याने या क्रीडा पत्रकाराचा मृत्यू झाला. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्याने मंगळवारी ही दु:खद बातमी दिली. ‘द हिंदू’ चे वरिष्ठ क्रीडा पत्रकार एस. दिनाकर विजय नगर येथील हॉटेलच्या रुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यानंतर दिनाकर यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पोलिसांचा रिपोर्ट बाकी
एस.दिनाकर 57 वर्षांचे होते. ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा पहिला अंदाज आहे. इंदोरचे डीसीपी संपत उपाध्याय यांनी या प्रकरणात अजून कुठलही वक्तव्य केलेलं नाही. संपूर्ण तपास केल्यानंतरच पोलीस यावर आपलं मत मांडतील.
ते अहमदाबादला रवाना होणार होते
दिनाकर यांनी बॉर्डर-गावस्कर सीरीजचा तिसरा कसोटी सामना कव्हर केला. भारत आणि ऑस्ट्रेलियात इंदोर येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचच रिपोर्टिंग केलं होतं. नऊ मार्चपासून सुरु होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या टेस्ट मॅचच रिपोर्टिंग करण्यासाठी अहमदाबादला जाण्याची तयारी करत होते. दिनाकर मंगळवारी सकाळी इंदोरहून अहमदाबादला रवाना होणार होते. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.