मुंबई: आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World Cup) अंतिम संघ निवडण्याची मुदत जाहीर झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सर्व क्रिकेट बोर्डांना 15 सप्टेंबरपर्यंत 15 सदस्यीय संघाची यादी सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. आता हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीकडे टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ निवड करण्याकरता फक्त चार संधी उरल्या आहेत. यंदा ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. आता हेड कोच राहुल द्रविड यांच्याकडे अंतिम संघ निश्चित करण्यासाठी फक्त काही सामने उरले आहेत. मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतच भारताचं आव्हान संपुष्टात आलं होतं. सलामीच्या सामन्यात पाकिस्तानकडून जिव्हारी लागणारा पराभव झाला होता. आता त्या सर्व कटू आठवणी पुसून नव्याने झेप घेण्याची टीम इंडियाकडे संधी आहे.
पहिली संधी –
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयर्लंडमध्ये दोन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
दुसरी संधी –
जुलै महिन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. आयपीएल 2022 नंतर भारतीय संघ या मालिकेत पूर्ण ताकदीने खेळताना दिसणार आहे.
तिसरी संधी –
इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर तोच संघ वेस्ट इंडिजला जाऊ शकतो. तिथे वेस्ट इंडिज विरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
चौथी संधी –
27 ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धा होणार आहे. सामन्याच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत.
26 जून आणि 28 जून असे आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामने खेळणार आहे.
7 जुलै ते 10 जुलै दरम्यान इंग्लंड विरुद्ध तीन टी 20 सामन्यांची सीरीज होईल.
29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध तीन टी 20 सामन्याची मालिका होईल.