IPL 2021: राशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, हैद्राबाद संघाच्या CEO ने दिली माहिती

| Updated on: Aug 16, 2021 | 5:47 PM

संपूर्ण जगाचे लक्ष सध्या अफगाणिस्तान येथील परिस्थितीवर आहे. तालिबान समर्थकांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. अशामध्ये अफगाणिस्तानचे खेळाडू मोहम्मद नबी, राशिद खान आयपीएलमध्ये खेळणार का हा? प्रश्न क्रिकेट रसिकांना पडला आहे.

IPL 2021: राशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, हैद्राबाद संघाच्या CEO ने दिली माहिती
राशिद खान
Follow us on

लंडन : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या सैन्याने सक्रीय होत, अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला आहे (Afghanistan and taliban crisis). राजधानी काबूलसह आता अनेक शहरं तालिबानच्या ताब्यात आहेत. यामुळे संपूर्ण देश संकटात सापडला आहे. यामुळे अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू राशिद खान (Rashid Khan) आणि मोहम्मद नबी (Mohammad Nabi) जे आयपीएलमध्ये (IPL 2021) सनरायजर्स हैद्राबाद संघाचे (SRH) महत्त्वाचे खेळाडू आहेत. त्यांच्या IPL खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पण या प्रश्नाचं उत्तर हैद्राबाद संघाचे सीईओ के.शानमुगम यांनी दिलं आहे.

के. शानमुगम यांनी एएनआयशी बोलताना माहिती दिली की, ”राशिद आणि नबी हे दोघेही पुढील महिन्यापासून युएईमध्ये सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळणार आहेत. आताच्या ताज्या घडामोडींनंतर त्यांच्याशी आमचं खेळाडूंशी बोलणं झालेलं नाही, पण दोघेही हैद्राबाद संघाकडून नक्कीच खेळताना दिसतील.” पुढे बोलताना हैद्राबादचे खेळाडू 31 ऑगस्टपर्यंत युएईसाठी रवाना होतील असंही के.शानमुगम यांनी सांगितलं.

सध्या राशिद आणि नबी इंग्लंडमध्ये

राशिद आणि नबी दोघेही सध्या इंग्लंडच्या द हंड्रेड (The Hundred) या स्थानिक स्पर्धेत खेळत आहेत. त्यामुळे ते दोघेही इंग्लंडमध्येच असून त्यांचे कुटुंबीय मात्र अफगाणिस्तानमध्ये आहेत. राशिदने त्याच्या कुटुंबियाच्या काळजीत अनेक सोशल मीडिया पोस्ट केल्या आहेत. त्याने रडण्याचे इमोजी टाकत मी नीट झोपूही शकत नाही असंही एका स्टोरीमध्ये लिहिलं आहे.

राशिद खानची इन्स्टाग्राम स्टोरी

अफगानिस्तानच्या क्रिकेट संघावरही संकट

तालिबानी सैन्याने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याने सर्व क्रिकेटची मैदानं देखील ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेटचं भविष्य धोक्यात आलं आहे. अफगाणिस्तानला आगामी T20 वर्ल्ड कपची तयारी करायची असून या सर्व संकटामुळे संपूर्ण अफगाणिस्तान क्रिकेटचं तणावाखाली आलं आहे.

हे ही वाचा

अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात, स्टार क्रिकेटपटू राशीद खानचं कुटुंब अडकलं, इंग्लंडमध्ये धाकधूक

Afghanistan Crisis : नवा राष्ट्रपती थेट देशाचं नाव बदलण्याची चिन्हं, अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?