नवी दिल्ली: भारता विरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेने (India vs Srilanka) सोमवारी संघ जाहीर केला. लखनऊ आणि धर्मशाळा या दोन ठिकाणी 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान ही टी 20 मालिका होणार आहे. दासुन शनाका श्रीलंकेच्या टीमचे नेतृत्व करणार आहे. चरिथ असालांका संघाचा उपकर्णधार आहे. चांडीमल, वानेंदु हसारंगा सारखे खेळाडू या टीममध्ये आहेत. हसारंगाला IPL Auction 2022 मध्ये तब्बल 10.75 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं आहे. त्यामुळे वानेंदु हसारंगाच्या (Wanindu Hasaranga) कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असेल. महीश तीक्ष्णा या मिस्ट्री स्पिनरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. हा मिस्ट्री स्पिनर चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळतोय. त्याशिवाय दुष्मंता चमीरा श्रीलंकेच्या संघाचा भाग आहे.
टी20 सीरीजसाठी अशी आहे श्रीलंकेची टीम
दसुन शनाका, चरिथ असालांका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, दिनेश चांडीमल, धनुष्का गुणातिलका, कामिल मिशारा, जनथ लियानागे, वानेंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, दुष्मंता चमीरा, बिनुरा फर्नाण्डो, शिरन फर्नाण्डो, महीश तीक्ष्णा, जॅफरी वेंडरसे, प्रवीन जयाविक्रमा, आशियान डेनियल.
Sri Lanka T20I squad for India tour 2022 – https://t.co/SofZ6k22gC
⬇️#INDvSL pic.twitter.com/Pfj3TTehOg— Sri Lanka Cricket ?? (@OfficialSLC) February 21, 2022
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अशी कामगिरी
श्रीलंकेच्या संघाने नुकताच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. तिथे त्यांना टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-4 ने पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी पहिले चार सामने गमावले. शेवटच्या सामन्यात त्यांना पाच विकेटने विजय मिळाला. श्रीलंकेचा संघ भले मालिका हरला असेल, पण त्यांनी ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला कडवी टक्कर दिली. कुशल मेंडिसने 50 च्या सरासरीने 100 धावा केल्या. निसांकाने 26.80 च्या सरासरीने 184 धावा केल्या. शनाकानेही चांगली फलंदाजी केली. गोलंदाजीत महेश तीक्ष्णाने पाच विकेट घेतल्या. दुष्मंता चमीराने सर्वाधिक सात विकेट घेतल्या. वानेंदु हसारंगाने दोन सामन्यात पाच विकेट घेतल्या. भारताला श्रीलंकेचा हा संघ कडवी टक्कर देऊ शकतो.
श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम
भारत आणि श्रीलंकेमध्ये आधी टी 20 सामन्यांची मालिका होईल. त्यानंतर दोन कसोटी सामने होतील. पहिली कसोटी मोहाली येथे चार मार्चपासून सुरु होईल. दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बंगळुरुमध्ये खेळला जाईल.
sri lanka announced 18 members team for t20 series against india