मुंबई: आशिया कप 2022 मध्ये श्रीलंकन टीमने भल्या, भल्या क्रिकेट पंडितांना धक्का दिला. टुर्नामेंट सुरु होण्याआधी श्रीलंका आशिया कप जिंकणार, असा कोणालाही वाटलं नव्हतं. पण श्रीलंकेने हे करुन दाखवलं. श्रीलंकन क्रिकेट बदलाच्या टप्प्यात असताना त्यांनी ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर श्रीलंकन टीमचा आत्मविश्वास उंचावला आहे. ते आपला जुना लौकीक मिळवण्याचा प्रयत्न करतायत.
श्रीलंकन बोर्डापासून वेगळे होणार
याच दरम्यान श्रीलंकन टीमला झटका बसला आहे. श्रीलंकन क्रिकेटचे डायरेक्टर टॉम मुडी आपल्या पदावरुन पायउतार होणार आहेत. टॉम मुडी करार संपण्याआधीच श्रीलंकन बोर्डापासून वेगळे होणार आहेत. श्रीलंकन क्रिकेट बोर्ड आणि टॉम मुडी यांनी परस्परसहमतीने हे ठरवलय.
किती वर्षासाठी करार केला होता?
पुढच्या महिन्यात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. श्रीलंकन टीम या टुर्नामेंटच्या तयारीमध्ये असताना ही बातमी आली आहे. आशिया कप 2022 चा विजय जुन्या मार्गावर परतण्याच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे. श्रीलंकन बोर्डाने तीन वर्षांसाठी मुडीसोबत करार केला होता. पण दीड वर्षातच त्यांचा कार्यकाळ संपवला जातोय.
भरपाई करावी लागेल
टॉम मुडी यांचा कार्यकाळ लवकर संपवल्याबद्दल श्रीलंकन बोर्डाला काही अतिरिक्त रक्कम मोजावी लागेल. श्रीलंकन बोर्ड त्यासाठी तयार आहे. “करार लवकर संपवल्याबद्दल आम्हाला अतिरिक्त रक्कम द्यावी लागेल. पुढच्या दीड वर्षाचा विचार करता, हा चांगला पर्याय आहे” द संडे टाइम्सने हे वृत्त दिलय. 45,000 अतिरिक्त डॉलर द्यावे लागतील.
का करार लवकर संपवला?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकन बोर्डाला टॉम मुडीचा खर्च झेपत नाहीय. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतलाय. वर्षाच्या फी सोबत बोर्डाला मुडी यांना श्रीलंकेत असताना वेगवेगळ्या सुविधा द्याव्या लागतात.
आधी सुद्धा श्रीलंकेचे कोच होते
टॉम मुडी याआधी 2005 ते 2007 दरम्यान श्रीलंकन टीमचे कोच होते. त्यावेळी श्रीलंकन टीमने वनडे आणि टेस्टमध्ये शानदार खेळ दाखवला होता. श्रीलंकेची टीम 2007 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. ऑस्ट्रेलियन टीमने त्यांचा पराभव केला होता.