मुंबई: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप (T20 World cup) स्पर्धा सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी धक्कादायक निकाल पहायला मिळाला. रविवारी झालेल्या सामन्यात नामीबियाने श्रीलंकेवर (SL vs NAM) विजय मिळवला. मागच्याच महिन्यात श्रीलंकेने आशिया कपचे (Asia cup) विजेतेपद पटकावलं होतं. श्रीलंकेचा नामीबियाकडून पराभव होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नामीबियाने श्रीलंकेवर विजय मिळवला.
टप्पा आणि दिशा भरकटली
नामीबिया टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 163 धावा केल्या. श्रीलंकेची टीम या लक्ष्याचा पाठलाग करताना 108 धावांवर ऑलआऊट झाली. श्रीलंकेच्या गोलंदाजांना या मॅचमध्ये चांगली सुरुवात मिळाली होती. पण नंतर श्रीलंकन गोलंदाजांचा टप्पा आणि दिशा भरकटली. नामीबियाने चांगली धावसंख्या उभारली.
तीन गोलंदाजांची इकॉनमी जास्त
श्रीलंकेच्या तीन गोलंदाजांनी नऊ इकॉनमीपेक्षा जास्त धावा दिल्या. दुश्मंथा चामीराने 4 ओव्हरमध्ये 39 रन्स देऊन एक विकेट घेतला. प्रमोद मधुशन लियांगगमागेने चार ओव्हरमध्ये 9.75 च्या सरासरीने 37 धावा दिल्या.चामिका करुणारत्नेने चार ओव्हरमध्ये 36 धावा दिल्या व एक विकेट काढली. त्याची इकॉनमी नऊची होती.
टीमला गरज असताना दोघे आऊट
टीमची सलामीची जोडी पूर्णपणे फ्लॉप ठरली. पाथुम निसांका आणि कुसल मेंडीस यांनी चांगली सुरुवात केली नाही. निसांका 9 आणि मेंडीस 6 धावांवर आऊट झाला.
दानुष्का गुणाथिलका खातही उघडू शकला नाही. भानुका राजपक्षे आणि दासुन शनाकाने चांगली सुरुवात केली. पण मोठी इनिंग खेळू शकले नाहीत. भानुकाने 20 आणि दासुनने 29 धावा केल्या. टीमला गरज असताना दोघे आऊट झाले.